Shardul Thakur: गेल्या वर्षी झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२५) मेगा लिलावात शार्दुल ठाकूरला कोणत्याही कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. पण, वेगवान गोलंदाज मोहसीन खान जखमी झाल्यानंतर, लखनौ सुपर जायंट्सने त्याचा बदली खेळाडू म्हणून संघात समावेश केला आहे. यानंतर शार्दुलने आतपर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. दरम्यान वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने समालोचकांवर जोरदार टीका केली आहे.

शार्दुलने आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये लखनौला अजिबात निराश केलेले नाही. तो स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे असून, वेगवान गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर आहे. शनिवारी, १२ एप्रिल रोजी लखनौ येथील अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात सुपर जायंट्सने ६ विकेट्सनी विजय मिळवला. यामध्ये शार्दुलने शानदार कामगिरी केली. शार्दुलने शरफान रदरफोर्ड आणि राहुल तेवतिया यांना बाद करत ४ षटकांत ३४ धावा देत २ बळी घेतले.

पत्रकार परिषदेत शार्दुल म्हणाला, “मला नेहमीच असे वाटते की गोलंदाजी युनिट म्हणून आम्ही संपूर्ण हंगामात चांगली कामगिरी केली आहे. अनेकदा समालोचन करताना आमच्यावर खूप टीका होते, ते गोलंदाजांबाबत कठोर बोलत असतात, परंतु आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की, क्रिकेट आता अशा दिशेने जात आहे जिथे २०० हून अधिक धावा करणे सामान्य झाले आहे.”

तो पुढे म्हणाला, “दोन वेळा प्रथम फलंदाजी केल्यानंतर आम्ही धावसंख्येचा यशस्वीपणे बचाव केला. याचे श्रेय आम्हाला द्यायला हवे. आम्ही चांगली धावसंख्या उभारली, खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती, पण तरीही आम्ही जिंकलो, एकदा १० धावांनी, तर एकदा ४ धावांनी. त्यामुळे शेवटपर्यंत धीर धरण्याची आणि आपण जिंकू शकतो यावर विश्वास ठेवण्याची गरज असते.”

“आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे, टीका होत राहील, विशेषतः समालोचकांकडून. स्टुडिओमध्ये बसून एखाद्याच्या गोलंदाजीवर भाष्य करणे सोपे आहे, परंतु ते मैदानावरील खरी परिस्थिती पाहू शकत नाहीत. मला वाटते की त्यांनी इतर कोणावरही टीका करण्यापूर्वी स्वतःची आकडेवारी पाहिली पाहिजे,” असे शार्दुल ठाकूर शेवटी म्हणाला.

दरम्यान, शार्दुल ठाकूरने सहा सामन्यांमध्ये १०.३८ च्या इकॉनॉमी रेटने ११ विकेट्स घेतल्या आहेत. गुजरात टायटन्सवर विजय मिळवल्यानंतर, लखनै सुपर जायंट्स संघ आठ गुणांसह आणि +०.१६२ च्या नेट रन रेटसह क्रमवारी अव्वल चारमध्ये पोहचला आहे.