पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तानी क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार बाबर आझमसाठी इंडियन प्रिमिअर लिगच्या (आयपीएलच्या) लिलावात १५ ते २० कोटी रुपयांची बोली लागू शकते असं मत व्यक्त केलंय. आतापर्यंतच्या एकूण १४ आयपीएल पर्वांपैकी पाकिस्तानी खेळाडू केवळ पहिल्या पर्वामध्ये खेळले आहेत. २००८ साली हे पर्व झालं होतं. त्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवरील तणावामुळे क्रिकेटमधील असहकार्याची भूमिका दोन्ही क्रिकेट बोर्डांनी घेतल्याने पाकिस्तानी खेळाडूंशिवाय आयपीएल आयोजित केलं जातं. त्यामुळेच जर पाकिस्तानी क्रिकेटपटूंना पुन्हा आयपीएलमध्ये प्रवेश दिल्यास बाबर आझमला सर्वाधिक पैसा मिळेल असं शोएब म्हणालाय.
‘स्पोर्टसकिडा’वर आयपीएलच्या सामन्याआधी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये पाकिस्तानी खेळाडूंना पुन्हा आयपीएलमध्ये संधी दिल्यास कोणत्या खेळाडूसाठी सर्वाधिक पैसा मोजला जाईल असा प्रश्न शोएबला विचारण्यात आला. त्यावर आधी मस्करीमध्ये उत्तर देताना त्याने, “मी विलचेअरवर असलो तरी याचं उत्तर मी मलाच असं देईल,” अशी मजेदार प्रतिक्रिया दिली. त्यानंतर त्याने बाबर आझमचं नाव घेतलं, “लिलावामध्ये बाबर आझमवर १५ ते २० कोटी रुपयांपर्यंतची बोली लागू शकते,” असं अख्तरने म्हटलं आहे. इतकचं नाही तर त्याने बाबर आझमला भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसोबत ओपनिंगला मैदानात उतरल्याचं पाहायला आवडेल असंही सांगितलं.
“बाबर आझम आणि विराट कोहलीसोबत एकत्र आयपीएल खेळताना पाहायला आवडेल. एखाद्या दिवशी ते आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून एकत्र खेळायला येतील हे पाहणं किती छान असेल,” असंही अख्तरने म्हटलं आहे. अख्तर स्वत: आयपीएलच्या पहिल्या पर्वामध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाकडून खेळला होता.
२००८ च्या आयपीएलच्या पर्वामध्ये खेळलेला शाहीद आफ्रिदी हा आयपीएलमधील पाकिस्तानचा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. तो २००८ मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळला होता. याशिवाय मिसाब-उल-हक, सोहेल तन्वीर, कमरान अकमाल, सलमान भट्ट, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, उमर गुल, युनिस खान, मोहम्मद आसिफ हे खेळाडूही या पर्वात आयपीएलमध्ये खेळले होते.