IPL 2025 Shashank Singh on Shreyas Iyer Missed Century GT vs PBKS: पंजाब किंग्स विरूद्ध गुजरात जायंट्स या आयपीएल २०२५ मधील पाचव्या अटीतटीच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या पंजाब संघाने ११ धावांनी बाजी मारली. नव्याने संघबांधणी केलेल्या पंजाब किंग्सने पहिल्याच सामन्यात आपली ताकद दाखवून दिली. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाबने आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या उभारली. पंजाबने २० षटकांत ५ गडी गमावून एकूण २४३ धावा केल्या.
श्रेयस अय्यरने या सामन्यात गुजरातच्या गोलंदाजांना जेरीस आणले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेला श्रेयस नाबाद ९७ धावा करत माघारी परतला. श्रेयसने ४२ चेंडूत ५ चौकार आणि ९ षटकारांसह ९७ धावांची खेळी केली. पण श्रेयसचे शतक अवघ्या ९७ धावांनी हुकले आणि यामागे कारण ठरला त्याचा संघसहकारी शशांक सिंग. शशांकने अखेरच्या षटकात फटकेबाजी करत श्रेयसला स्ट्राईक दिली नाही आणि त्यामुळे श्रेयसचं शतक हुकलं. पण शशांकने याबाबत मोठा खुलासा केला आहे.
श्रेयस अय्यरने १९व्या षटकाच्या अखेरीस ९७ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे अखेरच्या षटकात शशांक एक धाव घेऊन त्याला शतक पूर्ण करू देईल, अशी अपेक्षा होती. पण २०व्या षटकाच्या सिराजच्या पहिल्या चेंडूवर शशांकने चौकार मारला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. यानंतर, त्याने तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर पुढच्या दोन चेंडूंवर चौकार मारून कर्णधार अय्यरला स्ट्राईकच दिली नाही. त्यामुळे अय्यरचे शतक अवघ्या ३ धावांनी हुकले. तर शशांक सिंगने अवघ्या १६ चेंडूत ६चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४४ धावा केल्या.
सामन्यानंतर अय्यरच्या शतकाबाबत शशांक सिंग म्हणाला की, “होय, हा एक चांगला कॅमिओ होता. पण श्रेयसची फलंदाजी पाहून मला आणखी प्रेरणा मिळाली. खरं सांगायचं तर श्रेयस मला पहिल्याच चेंडूपासून म्हणाला होता, माझ्या शतकाचा विचार करू नकोस, फटकेबाजीकडे लक्ष दे.”
पुढे शशांक म्हणाला, “मी चेंडू पाहतो आणि खात्रीशीर चौकार लगावण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरतो, तेव्हा काही वेळेस चांगले फटका बसण्याची शक्यता कमी असते. मला माहित आहे की मी कोणते फटके खात्रीशीर खेळू शकतो. मी करू शकत नसलेल्या गोष्टींपेक्षा मी माझ्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करतो.”
श्रेयस अय्यरच्या ९७ धावा, चांगली सुरूवात आणि शशांक सिंगची फटकेबाजी या जोरावर पंजाबने मोठी धावसंख्या उभारली. यानंतर अखेरच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करत पंजाबने गुजरातवर ११ धावांनी विजय मिळवला.