IPL 2025 Shreyas Iyer Video: आयपीएल २०२५ मध्ये आज श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली पंजाब संघ सीएसकेविरूद्ध खेळताना दिसणार आहे. दरम्यान पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान श्रेयस रडत होता असल्याचे त्याने सांगितले.
भारतीय क्रिकेट संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात श्रेयस अय्यरने महत्त्वाची भूमिका बजावली. पण आता त्याने आयपीएल २०२५ दरम्यान एक मोठा खुलासा केला आहे आणि सांगितले आहे की दुबईमध्ये स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तो रडत होता. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर स्वतःवर रागावला होता आणि नाराज असल्याचे तो म्हणाला. श्रेयस चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने पाच डावांमध्ये ४८.६० च्या सरासरीने २४३ धावा केल्या आणि टीम इंडियाला तिसऱ्यांदा जेतेपद जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
पंजाब किंग्जच्या ‘कँडिड विथ किंग्ज’ या कार्यक्रमात बोलताना श्रेयसने चॅम्पियन्स ट्रॉफीशी संबंधित एक खुलासा केला. त्याला विचारण्यात आले की तो शेवटचा कधी रडला होता आणि त्याच्या उत्तराने सर्वांना आश्चर्यचकित केले. श्रेयस म्हणाला, “मी शेवटचं चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान रडलो होतो. पहिल्या सराव सत्रानंतर मी रडलो होतो. मी नुसताच रडतच होतो.”
चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान श्रेयस अय्यर का रडला होता?
श्रेयस त्याच्या रडण्यामागचं कारण सांगताना म्हणाला, “मी खूप रडलो, कारण मी नेटमध्ये फलंदाजी केली आणि ती चांगली झाली नाही. मला स्वतःवर इतका राग आला की मी रडू लागलो आणि मला स्वतःला पाहून आश्चर्यचकित झालो होतो कारण मी इतक्या सहजासहजी कधी रडत नाही.”
श्रेयसने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मैदानावर झालेल्या एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केली होती. तो म्हणाला, “मला वाटलं होतं की मी इथे (भारतात) फॉर्ममध्ये होतो तोच फॉर्म मी तिथेही कायम ठेवेन. पण तिथली (दुबई) खेळपट्टी खूप वेगळी होती आणि पहिल्याच दिवशी त्याच्याशी जुळवून घेणे खूप कठीण होतं. जेव्हा सराव सत्र संपलं तेव्हा मला थोडा जास्त सराव करायचा होता आणि मला सरावाची संधी मिळाली नाही, म्हणून मला राग आला होता.”
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील श्रेयस अय्यरच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर आयसीसीने त्याची दखल घेतली आहे. श्रेयस अय्यरची आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ मार्चसाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे.