श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील पंजाब किंग्स संघाने केकेआर संघाचा १६ धावांनी लाजिरवाणा पराभव केला आहे. पंजाब किंग्सने केकेआरला विजयासाठी ११२ धावांचे लक्ष्य दिले होते. पण केकेआरचा संघ ९५ धावांवर सर्वबाद झाला. श्रेयस अय्यर ज्या संघाचा गतवर्षी कर्णधार होता, त्याच संघाविरूद्ध यंदा त्याने पंजाब किंग्सचे नेतृत्त्व करत आयपीएलमधील ऐतिहासिक विजय नोंदवला.
श्रेयस अय्यर हा आयपीएलमधील चॅम्पियन कर्णधार आहे. श्रेयसच्या नेतृत्त्वाखाली केकेआर संघाने आयपीएल २०२४ चे जेतेपद पटकावले. यानंतर पुढील सीझनसाठी म्हणजेच आयपीएल २०२५ साठी महालिलाव होणार होता. या लिलावापूर्वी सर्व संघांना आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची होती. पण केकेआरने ही यादी जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. केकेआरने संघाच्या चॅम्पियन कर्णधारालाच रिटेन केलं नाही, यामुळे श्रेयस खूप निराश झाला असल्याचे त्याने सांगितले होते.
श्रेयस अय्यरने देखील संघ रिटेन करेल याची खात्री असल्याचं सांगितलं होतं, याबाबत बोलताना श्रेयस म्हणाला होता, “निश्चितच, केकेआरसाठी चॅम्पियनशिप जिंकलो तो काळ खूपच विलक्षण होता. चाहत्यांचा पाठिंबा उत्कृष्ट होता, स्टेडियममध्ये चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि मी तिथे घालवलेला प्रत्येक क्षण हा कमाल होता. त्यामुळे साहजिकच आयपीएल चॅम्पियनशिपनंतर आमची चर्चा झाली. परंतु काही महिने टाळाटाळ झाली आणि रिटेंशनची चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडून फारसे प्रयत्न झाले नाहीत. नेमकं चाललंय काय याबाबत मी गोंधळून गेलो होतो. त्यामुळे संवादाच्या अभावामुळे, आम्ही अशा वळणावर आलो जिथे आम्ही एकमेकांपासून वेगळे झालो. यामागचं हेच साधं सोपं सत्य आहे.”
केकेआरने रिटेन केलं नाही हे पाहून श्रेयस निराश झाल्याचं त्याने सांगितलं होतं. तो म्हणाला, “हो साहजिकचं मी निराश झालो, कारण जेव्हा नीट संवाद साधला जात नाही आणि रिटेंशनच्या तारखेच्या एक आठवडाआधी जर चर्चा होत असेल तर साहजिकचं कुठेतरी पाणी मुरतंय. त्यामुळे मला ठाम निर्णय घ्यावा लागला. जे घडायचं आहे तर घडणारच आहे. पण याव्यतिरिक्त, मी केकेआरमध्ये शाहरूख सर, त्या संपूर्ण संघाबरोबर आणि एकंदरीत सर्वांबरोबरच जो वेळ घालवला तो खरंच कमाल होता आणि अर्थातच, चॅम्पियनशिप जिंकणे हा कदाचित माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता.
यानंतर श्रेयस अय्यरला आयपीएल २०२५ च्या लिलावात पंजाब किंग्स संघाने २६.७५ कोटींची विक्रमी बोली लावत संघात सहभागी केले. यानंतर आता पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरला येत्या हंगामासाठी संघाचा कर्णधार म्हणूनही घोषित केलं. पंजाबचा कर्णधार झाल्यानंतर आणि केकेआरकडून मिळालेल्या अशा वागणुकीचा श्रेयसने केकेआरचा पराभव करत जणू काही बदलाच घेतला आहे अशी चर्चा रंगली आहे.
केकेआरविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, “या विजयाचं शब्दात वर्णन करणं अवघड आहे. चेंडू थांबून वळत होता. चहलला मी श्वासावर नियंत्रण ठेवण्यास सांगितलं. आम्हाला विकेटसाठी आक्रमण करणं आवश्यक होतं. मला आता बोलता येत नाहीये, जिंकलो आहोत हे पचनी पडलेलं नाही. मी बॅटिंग करायला गेलो तेव्हा दोन चेंडूंचा सामना केला. एक चेंडू खाली राहिला. दुसरा व्यवस्थित बॅटवर आला. खेळपट्टीत चेंडूला असमान उसळी मिळत होती. आम्ही १६ धावांनी जिंकलो ते पाहता आम्ही सन्मानजनक धावसंख्या गाठली असं म्हणायला हवं. चेंडूला निरनिराळ्या पद्धतीने उसळी मिळत होती.”
पुढे श्रेयस म्हणाला, “दोन षटकात दोन विकेट्स यामुळे सामन्याचं पारडं आमच्याकडे झुकलं. कोलकाताच्या दोन फलंदाजांनी सामन्याचं पारडं त्यांच्या दिशेने झुकवलं. पण चहलचा चेंडू वळू लागल्यावर आमच्या आशा उंचावल्या. तो विकेट्स पटकावू लागला आणि आता जिंकायचंच हे आम्ही पक्कं केलं. बॅट्समनच्या जवळ उभं राहिल्यास झेल येऊ शकतात यामुळे क्षेत्ररक्षकांनी जवळ उभं राहावं अशी सूचना होती. या विजयाने पुढील सामन्यात चांगल्या कामगिरीला बळ देईल. अशा पद्धतीचा झुंजार विजय अत्यंत प्रेरणादायी आणि आवश्यक होता.”