श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंना इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळण्यापासून रोखण्याचे श्रीलंका क्रिकेट मंडळावरील दबाव वाढत आहे. परंतु खेळाडूंना थांबविण्याच्याबाबतीत आपण हतबल असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
‘‘आम्ही खेळाडूंना आयपीएलसाठी भारतात जाऊ नका, असे र्निबध घालू शकत नाही,’’ असे श्रीलंका क्रिकेट मंडळाचे सचिव निशांता राणातुंगा यांनी सांगितले. बुद्धिस्ट नॅशनलिस्ट ग्रुपने गेल्या आठवडय़ात क्रिकेटपटूंना आयपीएलसाठी भारतात जाण्यापासून रोखण्यासंदर्भात श्रीलंका क्रिकेट मंडळाविरोधात एक विनंती केली होती. तामिळनाडूत श्रीलंकेच्या खेळाडूंचे सामने नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खेळाडूंना कुठेही जाता येईल, असे श्रीलंकेमधील सरकारने स्पष्टीकरण दिले होते. रावण दलानेही श्रीलंका क्रिकेट मंडळाला खेळाडूंनी बहिष्कार टाकण्यासंदर्भात इशारा दिला आहे. जर खेळाडू भारतात गेले तर आम्ही आमचा लढा तीव्र करू, असे त्यांनी म्हटले आहे.
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी श्रीलंकेच्या खेळाडूंना आपल्या राज्यात प्रवेशासाठी बंदी घातली आहे. याचा निषेध म्हणून श्रीलंकेच्या खेळाडूंनी आयपीएल खेळू नये, असे रावण दल आणि राष्ट्रीय भिक्षू महासंघ यांनी इशारा दिला आहे. न्यूवान कुलसेकरा आणि अकिला धनंजय या खेळाडूंना चेन्नई सुपर किंग्जमधून वगळण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर तामिळनाडूमध्ये श्रीलंकाविरोधी शक्ती कार्यरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
श्रीलंकेच्या दोन खेळाडूंना चेन्नईच्या संघातून वगळणे, ही गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे श्रीलंकेने भारतात आयपीएल खेळण्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे, असे श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन राणातुंगा यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा