CSK vs SRH Shruti Hasan Crying After CSK Defeat Video IPL 2025: चेन्नई सुपर किंग्ससाठी अभेद्य किल्ला असणारं चेपॉकचं मैदान यंदा मात्र ढासळलं आहे. सीएसकेने यंदा घरच्या मैदानावर विक्रमी तीन सामने गमावले आहेत. सनरायझर्स हैदराबादने तर आयपीएल इतिहासात प्रथमच चेपॉकच्या मैदानावर दणदणीत विजय मिळवला. चेन्नई वि. हैदराबाद हा सामना पाहण्यासाठी चेपॉकच्या मैदानावर अभिनेत्री श्रुती हसनदेखील उपस्थित होते. चेन्नईच्या पराभवानंतर श्रुती हसनचा रडतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
श्रुतीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती चेन्नई संघ आणि महेंद्रसिंग धोनीला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली आहे. मात्र या सामन्यात तिच्या आवडत्या सीएसकेला हैदराबादविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला. तिच्या आवडत्या संघाला हरताना पाहून श्रुती इतकी भावूक झाली की ती स्टेडियममध्येच रडू लागली.
चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यातील श्रुती हासनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती खूप भावुक झालेली दिसत आहे आणि तिचे अश्रू पुसताना दिसत आहे. तिच्या आवडत्या संघाला हरताना पाहून श्रुती फारच निराश झाली होती. श्रुती हसनशिवाय ज्येष्ठ अभिनेते अजित कुमार हे देखील त्यांच्या कुटुंबासह सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले होते. त्यांचा मुलगा चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीमध्ये दिसला.
सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा ८ चेंडू शिल्लक ठेवत ५ विकेट्सने पराभव करून इतिहास घडवला. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सीएसकेचा डाव फक्त १५४ धावांवर गुंडाळला. चेन्नईकडून, युवा फलंदाज आयुष म्हात्रेने झटपट ३० धावा केल्या, तर पदार्पण करणाऱ्या डेवाल्ड ब्रेव्हिसने ४४ धावांची खेळी केली.
आपला ४०० वा टी-२० सामना खेळणाऱ्या कर्णधार धोनीची बॅट संघाला गरज असताना कमाल करू शकली नाही आणि तो १० चेंडूत फक्त ६ धावा करत सहज झेलबाद झाला. हैदराबादने हे छोटे लक्ष्य १८.४ षटकांत पूर्ण केले. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच, सनरायझर्स हैदराबादने चेपॉकवर चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला आहे.

घरच्या मैदानावर चेन्नईचा आणखी एक पराभव झाल्याने संघाच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. या पराभवामुळे संघाच्या प्लेऑफच्या आशा जवळजवळ संपल्या आहेत. चेन्नईच्या संघाला जर आता प्लेऑफसाठी पात्र ठरायचे असेल तर त्यांना कोणत्याही किंमतीत उर्वरित ५ सामने जिंकावे लागतील. इतकंच नव्हे तर त्यांना मोठ्या फरकाने सामने जिंकत नेट रन रेटही सुधारावा लागला.
याशिवाय, चेन्नईला आता इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल. संघाने सध्या नऊ पैकी सात सामने गमावले आहेत आणि फक्त दोन सामने जिंकले आहेत. सातत्याने खराब कामगिरीमुळे, संघ सध्या पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे.