सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स आयपीएल २०२४ चा सामना हैदराबादमधील जोरदार पावसामुळे रद्द झाला. पण या सामन्यातील एका क्षणाने सर्वांचे लक्ष वेधले. हैदराबादचा अष्टपैलू अभिषेक शर्मा आणि गुजरातचा कर्णधार शुबमन गिल यांचा राजीव गांधी स्टेडियममधील स्टँडमधील एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. पावसामुळे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये बसून होते. यादरम्यान अभिषेक आणि गिलला स्टँडमध्ये अभिषेकच्या कुटुंबाला भेटायला गेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हैदराबाद-गुजरातचा सामना पाहायला अभिषेकचे कुटुंबीय आले होते. स्टॅन्डसमध्ये अभिषेकची आई मंजू आणि बहीण कोमल बसल्या होत्या. गिलला पाहून शर्मा कुटुंबाला खूप आनंद झाला आणि त्यांनी गिलचे मनापासून स्वागत केले. गिलनेही आपल्या कृतीने मने जिंकली. गिलने अभिषेकच्या कुटुंबाची भेट घेताच त्याच्या आईला खाली वाकून नमस्कार केला. तर बाजूला असलेल्या त्याच्या बहिणीला हात मिळवत स्माईल दिली. तर बोलत असताना अभिषेकची आई गिलच्या गालांवर थाप मारत त्याच्यावर आईप्रमाणे माया करत होती.

गिल आणि अभिषेक यांच्या कुटुंबाचा सर्वांसमोर असा पहिलाच संवाद असेल. परंतु दोन तरुण क्रिकेटपटू आणि त्यांच्या कुटुंबीयांची ओळख फार जुनी आहे. गिल आणि अभिषेक पंजाबमध्ये क्रिकेट खेळत एकत्र वाढले आणि ते एकमेकांचे जवळचे मित्रही आहेत. या दोघांनी २०१७ मध्ये पंजाबसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले आणि त्यानंतर २०१८ मध्ये अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि विजेतेपद जिंकले. गिलने त्या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यानंतर गिलच्या शानदार फटकेबाजीच्या जोरावर त्याची भारतीय संघात निवड झाली. पण अभिषेक शर्माच्य अष्टपैलू खेळीकडे दुर्लक्ष झाले होते. पण अभिषेकने आयपीएल २०२४ मधील आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले.

अभिषेक शर्माने या हंगामात हैदराबादसाठी सलामीला उतरताना तुफान फटकेबाजी केली आहे. पॉवरप्लेमध्ये ट्रेव्हिस हेडसोबत त्याने अनेक विक्रमही रचले. अभिषेक एक उत्कृष्ट फलंदाज तर आहेच पण तो एक चांगला फिरकीपटूही आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक शर्म गिलबाबत म्हणाला, “मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे. आम्ही चांगले मित्र आहोत.” या दोघांचे क्रिकेटमधील गुरू एकच आहे. तो म्हणजे भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग.

अभिषेक आणि गिल यांनी यंदाच्या आयपीएल मोसमात चांगली कामगिरी केली आहे. गिलचा संघ प्लेऑफमध्ये जाण्यात अयशस्वी ठरली असेल, परंतु त्याने १२ सामन्यांमध्ये ३८ च्या सरासरीने आणि १४७ च्या स्ट्राइक रेटने ४२६ धावा केल्या. त्याच्या पहिल्या सत्रात त्याच्या कर्णधार कौशल्याची सर्वांनीच प्रशंसा केली. तर अभिषेक शर्माने १२ सामन्यांमध्ये २०५ च्या स्ट्राईक रेटने ४०१ धावा केल्या. अभिषेकने या हंगामात सर्वाधिक ३५ षटकार लगावले आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubamn gill touches feet of abhishek sharma mother video viral in rajiv gandhi stadium srh vs gt ipl 2024 bdg