Kolkata Knight Riders vs Gujarat Titans Score Updates:आयपीएल २०२३ चा १३ वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुबमन गिलने आयपीएलच्या इतिहासात आणखी एक मोठा धमाका केला आहे. या लीगमध्ये दोन हजार धावा पूर्ण करणारा तो दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. गिलने वयाच्या २३ वर्षे २१४ दिवसांत आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध १३ धावा करून ही कामगिरी केली.
आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात २००० धावा करण्याचा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर आहे, ज्याने अवघ्या २३ वर्षे २७ दिवसांच्या वयात हा पराक्रम केला. यानंतर गिलचे नाव येते. गिलने सर्वात कमी वयात २००० धावा पूर्ण करताना संजू सॅमसन, विराट कोहली आणि सुरेश रैना यांना मागे टाकले आहे.
हेही वाचा – IPL 2023 KKR vs GT: केकेआरविरुद्धच्या सामन्यातून हार्दिक पांड्या का झाला बाहेर? मोठं कारण आलं समोर
आयपीएलमध्ये २००० धावा पूर्ण करणारे सर्वात तरुण खेळाडू –
१.ऋषभ पंत, २३ वर्षे २७ दिवस
२.शुबमन गिल, २३ वर्षे २१४ दिवस
३.संजू सॅमसन, २४ वर्षे १४० दिवस
४.विराट कोहली, २४ वर्षे १७५ दिवस
५.सुरेश रैना, २५ वर्षे १५५ दिवस
शुबमन गिलची आयपीएल मधील कामगिरी –
शुबमन गिल हा टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग आहे. हा सामना वगळता गिलने आतापर्यंत ७६ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २०१६ धावा केल्या. गिलने या लीगमध्ये १५ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने ५० षटकार आणि २०२ चौकार मारले आहेत.
कोलकाताला विजयासाठी २० षटकांत २०५ धावांचं लक्ष्य –
सामन्याबद्दल बोलायचे, तर साई सुदर्शननेही अप्रतिम फलंदाजी करत गुजरातच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. साई सुदर्शनने ३८ चेंडूत ५३ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. पण विजय शंकरने कोलकाताच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत २४ चेंडूत ६४ धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे गुजरात टायटन्सने २० षटकांत ४ विकेट्स गमावत २०४ धावांपर्यंत मजल मारली. केकेआरकडून सुनील नारायणने ४ षटकांत ३३ धावा देत तीन विकेट्स घेतल्या. कोलकाताला विजयासाठी २० षटकांत २०५ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.