आयपीएल २०२५ मधील गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुबमन गिल याचं सोशल मीडियावर खूप कौतुक केलं जात आहे. गुजरात टायटन्सचा संघ आज म्हणजेच २९ मार्चला मुंबई इंडियन्सविरूद्ध सामना खेळवला जात आहे. या सामन्यात झटपट खेळी करत शुबमन गिल बाद झाला. पण गिलचं कौतुक मात्र वेगळ्याच कारणामुळे होत आहे.

आयपीएलच्या व्यस्त वेळापत्रकादरम्यान मोठे मन दाखवत गिलने हॉस्पिटलला लाखोंची देणगी दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने मोहालीच्या सिव्हिल हॉस्पिटलला सुमारे ३५ लाख रुपयांची वैद्यकीय उपकरणे दान केली आहेत. गिलच्या या उपक्रमाबद्दल रुग्णालयाने कृतज्ञता व्यक्त केली असून यामुळे रुग्णांच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

शुबमन गिलने किती लाखांची दिली देणगी?

शुबमन गिलने रूग्णालयाला ३५ लाख रुपयांमध्ये व्हेंटिलेटर, सिरिंज पंप, ऑपरेशन थिएटर टेबल, आयसीयू बेड, एक्स-रे मशीन आणि छतावरील दिवे यांसारखी आवश्यक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे, ज्याचा उपयोग रुग्णांवर उपचार करण्यासाठी केला जातो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गिलने हा देणगी त्याच्या एका जवळच्या नातेवाईकाद्वारे दिली आहे, जो स्वतः एक वैद्यकीय व्यावसायिक आहे. गिलने उचलेल्या या पावलामुळे चाहत्यांनी भरभरून कौतुक केले. सोशल मीडियावर या उदात्त कार्याबद्दल त्याचे कौतुक करताना गिल एक दयाळू व्यक्ती असल्याचे वर्णन केले आहे.

शुबमन गिल हा पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील जयमल सिंहवाला गावचा रहिवासी आहे. पण मोहालीशी त्याचं एक वेगळं नात आहे. गिलचे वडील त्याला क्रिकेट शिकवण्यासाठी त्याच्या गावातून मोहालीला आले होते. यानंतर गिल याच शहरात लहानाचा मोठा झाला. इथूनच शिक्षण घेतले आणि क्रिकेटचे धडे गिरवले. अलीकडेच त्याने मोहालीमध्ये स्वतःचे एक आलिशान घर बांधण्यास सुरुवात केली आहे.

आयपीएलमधील मुंबई इंडियन्सविरूद्ध सुरू असलेल्या सामन्यात २७ चेंडूत ४ चौकार आणि एक षटकारासह ३८ धावा करून बाद झाला. गिल हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. गुजरातचा संघ नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीसाठी उतरला.