आयपीएल २०२४ मधील सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्समधील ६६ वा सामना पावसामुळे रद्द झाला. हा सामना रद्द झाल्यामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफचे तिकीट मिळाले, तर गुजरात टायन्सला निराशेचा सामना करावा लागला. कोणताही संघ सामना न खेळता सीझन संपवू इच्छित नाही, पण गुजरात टायटन्सच्या बाबतीत परिस्थिती खूपच खराब झाली. या संघाला घरच्याच मैदानावर चाहत्यांसमोर यंदाच्या सीझनमधील शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. गुजरात टायटन्सचे शेवटचे दोन सामने पावसामुळे हातून गेले, आयपीएलच्या इतिहासात एका संघाचे सलग दोन सामने पावसामुळे रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या परिस्थितीमुळे गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल मात्र खूप निराश झाला आहे. गुजरात टायटन्सची यंदाच्या सीझनमध्ये खेळण्याची संधी संपल्याने शुबमन गिलने एक भावनिक पोस्ट केली आहे. शुबमनने यात गुजरात टायटन्सच्या निराशाजनक कामगिरीवरसुद्धा भाष्य केलं आहे. शुबमनने एक्सवर एक पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुबमनने या पोस्टमध्ये म्हटले की, अशाप्रकारे शेवट होईल असे वाटले नव्हते. पण, यंदाचा सीझन खूप काही शिकवणारा आणि आठवणींचा खजिना आहे. मी गेल्या तीन वर्षांपासून या कुटुंबातील एक सदस्य आहे. हा एक असा प्रवास आहे जो मी केव्हाच विसरू शकत नाही, आम्हाला कठीण काळात साथ देणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्या सर्व चाहत्यांचे मी आभार मानू इच्छितो.

सुनील नरेनने बंगाली भाषेत दिलेली उत्तरं ऐकून चाहते अवाक्, VIDEO पाहून हसून झाले लोटपोट, म्हणाले…

गेल्या दोन आयपीएल सीझनमध्ये अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या आणि एकदा चॅम्पियन राहिलेल्या गुजरात टायटन्सला यंदा मात्र प्लेऑफचे तिकीटही मिळवता आले नाही. नवीन कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली संघाला १४ पैकी फक्त ५ सामने जिंकण्यात यश आले. या संघाने १२ गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहचून आपला प्रवास संपवला. यामुळे मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्जनंतर गुजरात टायटन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा तिसरा संघ ठरला आहे.

युवा खेळाडू साई सुदर्शनने यंदाच्या सीझनमध्ये गुजरात टायटन्ससाठी धमाकेदार कामगिरी केली. १२ सामन्यांमध्ये या खेळाडूने संघासाठी ४७.९१ च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक ५२७ धावा केल्या; तर कर्णधार शुबमन गिलने ४२६ धावा केल्या. पण, गोलंदाजीत टॉप १५ मध्ये गुजरातचा एकही खेळाडू नव्हता, त्यामुळे संघासाठी हीच कुठेतरी कमकुवत बाजू होती.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubman gill emotional post went viral after gujarat titans disappointing ipl 2024 season said not the way we hoped it would end sjr