Shubman Gill Statement on Relationship Video: टीम इंडियाचा प्रिन्स अशी ओळख निर्माण केलेला शुबमन गिल त्याच्या क्रिकेटबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चेत असतो. गिलचं नाव अनेकदा अभिनेत्री आणि काही प्रसिद्ध व्यक्तींशी जोडलं जातं. सध्या शुबमन गिल आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्त्व करत आहे. याचदरम्यान एका मुलाखतीत त्याने उपस्थिती लावली होती, जिथे त्याने त्याच्या वैयक्तिक जीवनाबाबत, क्रिकेटबाबत अनेक विषयांवर भाष्य केलं.

हल्ली शुबमन गिलच्या रिलेशनशिपबाबतची चर्चा समोर आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून गिलचे नाव माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरशी जोडले जात आहे. पण दोघांनीही यावर कधीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आता दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. त्यानंतर ब्रेकअपच्या बातम्या येऊ लागल्या. या सगळ्यामध्ये शुबमन गिलने त्याच्या लव्ह लाईफबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

सारा तेंडुलकर व्यतिरिक्त शुबमन गिलचे नाव रिद्धिमा पंडित, अनन्या पांडे, सोनम बाजवा आणि अवनीत कौरसह अनेक अभिनेत्रींबरोबर जोडले गेले आहे. पण शुबमन गिलने आता या मुद्द्यावर आपले मौन सोडले आहे. द हॉलिवूड रिपोर्टर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत गिलने त्याच्या क्रिकेटपासून ते वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं आहे.

गिलने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितले की, “मी गेल्या ३ वर्षांहून अधिक काळ सिंगल आहे, माझं नाव वेगवेगळ्या लोकांशी जोडण्याच्या अनेक चर्चा आणि अफवा समोर आल्या आहेत, काही वेळा तर त्या या चर्चा इतक्या भयंकर असतात की मी माझ्या आयुष्यात कधीही त्या व्यक्तीला पाहिलेलं नाही किंवा भेटलोही नाही, तरीही त्या व्यक्तीशी माझं नाव जोडलं जातं. सध्या माझं संपूर्ण लक्ष माझ्या करियरवर आहे.”

शुबमन गिलच्या या वक्तव्याने सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे आणि तो सध्या सिंगल असल्याचे स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी अशीही बातमी आली होती की शुबमन आता अवनीत कौरला डेट करत आहे. अवनीत आणि शुबमन त्यांच्या मित्रमैत्रिणींसह सुट्टीचा आनंद घेताना दिसले. तिने शुबमनला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छादेखील दिल्या होत्या. इतकंच नाही तर अवनीत अनेक वेळा क्रिकेट सामन्यांमध्ये टीम इंडियाला पाठिंबा देताना दिसली आहे.

मध्यंतरी गिलचं नाव सारा अली खानबरोबरही जोडलं जात होतं. ते दोघं एअरपोर्टवर एकत्रही दिसले होते. पण यानंतर याबाबत चर्चा झाली नाही. तर सारा तेंडुलकर आणि शुबमन गिलबाबत कायमच चर्चा सुरू असते. पण आता गिलच्या या वक्तव्यामुळे ते दोघेही रिलेशिनशिपमध्ये नसल्याचे स्पष्ट झाले आहे.