Shubman Gill- Sai Sudarshan Record In IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेत जर सर्वात यशस्वी सलामी जोडी असेल, तर ती शुभमन गिल आणि साई सुदर्शनची आहे. संपूर्ण स्पर्धेत या जोडीने गुजरात टायटन्स संघाला दमदार सुरूवात करून दिली आहे. राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातही सलामीला फलंदाजी करताना दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९३ धावा जोडल्या. यासह शुभमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीच्या नावावर एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

आयपीएल २०२५ स्पर्धेत असा रेकॉर्ड करणारी ठरली पहिलीच जोडी

गुजरात टायटन्सचा संघ सध्या गुणतालिकेत टॉप २ मध्ये आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने आतापर्यंत ६ सामने जिंकले आहेत. हे सर्व सामने जिंकण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे, गुजरात टायटन्सची फलंदाजी. गिल आणि साई सुदर्शनची जोडी संघाला दमदार सुरूवात करून देत आहेत. या हंगामातील ९ डावात मिळून दोघांनी ५४१ धावा जोडल्या आहेत. यासह आयपीएल २०२५ स्पर्धेत ५०० धावांची भागीदारी करणारी ही पहिलीच जोडी ठरली आहे. या हंगामात असा कारनामा कुठल्याही संघाला करता आलेला नाही.

आयपीएल २०२५ स्पर्धेत सर्वाधिक भागीदारी करताना सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

५४१ धावा – शुभमन गिल आणि साई सुदर्शन (९ डावात)

४२९ धावा – विराट कोहली आणि फिल सॉल्ट (८ डावात)

३७६ धावा – विराट कोहली आणि फिल सॉल्ट (९ डावात)

३६० धावा –प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग ( ९ डावात)

३५३ धावा – एडन मार्करम आणि मिचेल मार्श ( ९ डावात)

राजस्थानविरुद्ध खेळताना दमदार सुरूवात

आयपीएल २०२५ स्पर्धेतील ४७ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यातही या जोडीने जोरदार सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून ९३ धावा चोपल्या. साई सुदर्शनने ३० चेंडूंचा सामना करत ३९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि १ षटकार मारला. तर शुभमन गिलने ५० चेंडूंचा सामना करत ८४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारले. या खेळीच्या बळावर गुजरात टायटन्सने २० षटकांअखेर २०९ धावांचा डोंगर उभारला. यासह साई सुदर्शनने ऑरेंज कॅप देखील पटकावली आहे. साई सुदर्शनच्या नावे ९ सामन्यात ४४३ धावांची नोंद आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या विराट कोहलीने देखील ४४३ धावा केल्या आहेत.