GT vs CSK Match Updates : इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ५९ वा सामना आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्य गुजरात टायटन्सचा दोन्ही फलंदाजांनी शतकं झळकावत इतिहास रचला आहे. या सामन्यात प्रथम शुबमन गिलने ५० चेंडूत चौथे शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याचा साथीदार साई सुदर्शनने आयपीएल कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने पण अवघ्या ५० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शुबमन गिलचे शतक हे आयपीएल इतिहासातील १००वे शतक ठरले. आयपीएल इतिहासातील पहिले शतक झळकावण्याचा पराक्रम ब्रेंडन मॅक्युलमने केला होता.
आयपीएलमध्ये ‘शतक शंभरी’ –
याआधी ब्रेंडन मॅक्युलमने केकेआरसाठी खेळताना आरसीबीविरुद्ध १८ एप्रिल २००८ रोजी बंगळुरूत नाबाद १५८ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. आयपीएलच्या पहिल्यावहिल्या लढतीतच पहिले शतक झळकावण्याचा मान मॅक्युलमने पटकावला होता. गुजरात टायटन्ससाठी सलामीला आलेल्या साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी शानदार फलंदाजी केली. त्याने सुरुवातीपासूनच चौकार आणि षटकार मारण्यास सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी शतकी खेळी खेळली. या सामन्यात साई सुदर्शनच्या बॅटने शानदार शतक झळकावले. त्याचवेळी गिलनेही शतक झळकावले. या आयपीएलमध्ये ओपनिंग करताना शतकं झळकावणारी ही पहिली जोडी ठरली आहे. त्याचबरोबर आयपीएल इतिहासातील तिसरी जोडी ठरली आहे, ज्या जोडीने आयपीएलच्या एका डावात शतकं झळकावली आहेत.
साई सुदर्शनचे आयपीएलमधील पहिले शतक –
साई सुदर्शनने गुजरात टायटन्ससाठी शानदार फलंदाजी करत ५१ चेंडूत १०३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ७ षटकार मारले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूकडून खेळणारा साई सुदर्शन हा टॉप ऑर्डरचा फलंदाज आहे. २०२२ मध्ये आयपीएल दरम्यान सुदर्शन पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आला होता. गुजरात टायटन्सकडून खेळताना त्याने आयपीएलसारख्या मोठ्या मंचावर आपली प्रतिभा दाखवली. शुबमन गिलही उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला. त्यानेही शानदार शतक झळकावले. गिल कर्णधारपदाची खेळी खेळताना दिसला. गिलने ५५ चेंडूत १०४ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने नऊ चौकार आणि सहा षटकारा मारले. त्यानंतर तुषार देशपांडेच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना गिल रवींद्र जडेजाच्या हाती झेलबाद झाला. गिलचे आयपीएलमधील हे चौथे शतक होते.
हेही वाचा – BCCI : इशान- श्रेयसला करारातून बाहेर करण्याचा निर्णय कोणी घेतला? जय शाह यांनी केला खुलासा
गुजरातने चेन्नईला दिले २३२ धावांचे लक्ष्य –
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ३ गडी गमावून २३१ धावा केल्या. कर्णधार शुबमन गिलने १०४ धावा केल्या, तर साई सुदर्शनने १०३ धावा केल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी २१० धावांची विक्रमी भागीदारी केली. डेव्हिड मिलर ११ चेंडूत १६ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. तर शाहरुख खान दोन धावा करून धावबाद झाला. चेन्नईकडून तुषार देशपांडेने दोन बळी घेतले. चेन्नईने पहिल्या सहा षटकात ५८ धावा खर्च केल्या होत्या. त्याच वेळी, ७ ते १५ षटकांमध्ये म्हणजेच नऊ षटकांत गुजरातने एकही विकेट न गमावता १३२ धावा केल्या. १५ षटकांनंतर गुजरातची धावसंख्या एकही विकेट न गमावता १९० धावा होती. शेवटच्या पाच षटकांत गुजरात संघाला केवळ ४१ धावा करता आल्या आणि तीन विकेट गमावल्या.