Sikandar Raza Left Punjab Kings IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सवर पंजाब किंग्सने शानदार विजय मिळविल्यानंतर स्टार अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा याने आयपीएलमधून माघार घेतली आहे. सिकंदरने एक पोस्ट करीत पंजाब किंग्स संघ सोडल्याची घोषणा केली आहे. सिकंदर रझाने राष्ट्रीय कर्तव्यासाठी म्हणजे झिम्बाब्वेसाठी क्रिकेट खेळणार असल्याने संघ सोडत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सिकंदर रझा यापुढे IPL 2024 चा भाग असणार नाही.
झिम्बाब्वे संघ ३ मेपासून बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान संघ २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपची तयारी करणार आहे; तसेच पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. त्यात सिकंदर रझा झिम्बाब्वे टी-२० संघाचा कर्णधार आहे.
सिकंदर रझा याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट करीत आयपीएल आणि पंजाब किंग्ज संघ सोडल्याची माहिती दिली आहे. एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एक पोस्ट करीत रझाने लिहिले की, भारत, आयपीएल व पंजाब किंग्स माझ्याबरोबर असल्याने धन्यवाद! मला प्रत्येक मिनिटाचा आनंद घेता आला; पण आता राष्ट्रीय कर्तव्याची वेळ आली आहे. इन्शाअल्लाह आपण लवकरच पुन्हा भेटू.
सिकंदर रझाला आयपीएल २०२४ मध्ये पंजाब किंग्सकडून फक्त दोन सामने खेळण्याची संधी मिळाली; ज्यामध्ये त्याने २१.५० च्या स्ट्राईक रेटने ४३ धावा केल्या.