Shikhar Dhawan Press Conference : सनरायझर्स हैद्राबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएल २०२३ चा १४ वा सामना रंगतदार झाला. हैद्राबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबने २० षटकांत ९ विकेट्स गमावत १४३ धावा केल्या होत्या. पंजाबकडून कर्णधार शिखर धवनने वादळी खेळी करत ६६ चेंडूत ९९ धावा कुटल्या. त्यानंतर लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या सनरायझर्स हैद्राबादने १७.१ षटकात ८ विकेट्स राखून १४५ धावा करत यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
सामना संपल्यानंतर शिखर धवनने माध्यमांशी बोलताना म्हटलं की, “फलंदाजी करताना आम्ही खूप लवकर विकेट्स गमावल्या आणि मोठी धावसंख्या उभारू शकलो नाही. त्यामुळे आम्हाला या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. या खेळपट्टीवर १७५ पासून १८० धावांपर्यंत चांगला स्कोअर असू शकला असता. खेळपट्टी चांगली होती. पण यावर चेंडू स्विंग करत होता. आम्हाला या सामन्यातून खूप काही शिकायला मिळाला आणि आता आम्ही चांगलं प्रदर्शन कसं करता येईल यावर फोकस करू.”
त्यानंतर सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करमने मार्कंडेयचं कौतुक करत म्हटलं, “इंग्लंडच्या लेग स्पिनर आदिल राशिदच्या जागेवर या भारतीय फिरकीपटूला खेळवण्याचा निर्णय योग्य ठरला. हा चांगला निर्णय नव्हता पण मार्कंडेयने हा निर्णय योग्य असल्याचं सिद्ध करून दाखवलं. मला हे पाहून आनंद झाला. त्याने खूप चांगली गोलंदाजी केली. त्याने संधीचं सोनं केलं. तो खूप चर्चेत राहिला आहे आणि त्याने सिद्ध करुन दाखवलं की हे योग्य आहे.” पंजबच्या संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. यामध्ये दोन सामन्यात विजय मिळवला असून एका सामन्यात पंजाबचा पराभव झाला आहे.