Shahrukh Khan With Son Abram Viral Video : कोलकत्ता नाईट रायडर्सच्या सामन्यादरम्यान प्रेक्षकांच्या नजरा दोन ठिकाणी खिळल्या होत्या, एक म्हणजे मैदानातील सामन्यावर आणि दुसरी सुपरस्टार शाहरुख खानवर. शाहरुख त्याच्या संघाच्या प्रत्येक सामन्याच्या वेळी स्टेडियममध्ये उपस्थित असतो. नुकत्याच झालेल्या सामन्यानिमित्तही शाहरुखसह लेक अबरामही स्टेडियमवर पोहोचला आणि सामन्याचा आनंद घेत संघाला सपोर्ट करताना दिसला. या संपूर्ण सामन्यादरम्यानच्या बाप – लेकाच्या या जोडीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. कारण- या व्हिडीओत अबराम वडील शाहरुख खानवर चांगलाच भडकल्याचे दिसतेय.
हा व्हिडीओ सोमवारी ईडन गार्डनवर खेळल्या गेलेल्या केकेआर आणि दिल्ली कॅपिटल यांच्यातील सामन्यादरम्यानचा आहे. या सामन्यासाठी शाहरुखसह त्याचा लहान मुलगा अबराम स्टेडियमवर आला होता. यावेळी सामना पाहताना अबराम आणि शाहरुख यांच्यामध्ये छोटेसे भांडण झाले. त्यानंतर शाहरुखने मस्करीत त्याचा गळा पडकला; ज्यामुळे अबराम चांगला संतापला.
अबरामची वडिलांवर दादागिरी
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, शाहरुख खान आणि अबराम एकमेकांशी काहीतरी बोलत, मज्जा-मस्ती करताना दिसत आहेत. यावेळी शाहरुख मस्करीत दोन्ही हातांनी अबरामचा गळा दाबल्याचे नाटक करताना दिसत आहे; ज्यामुळे अबराम वडिलांवर भडकतो आणि आपल्या हाताने वडील शाहरुखचे हात बाजूला ढकलतो. डोळे वटारून तो शाहरुखकडे बघतो. शाहरुख त्याच्या बोलण्यावर हसताना दिसत आहे. पण, अबराम शाहरुखकडे एक बोट करून त्याला धमकीच देतोय, असे दिसते. अबराम काहीतरी सांगत असतो; ज्यावर शाहरुख मान हलवतो. त्यानंतर दोघे पुन्हा सामन्याचा आनंद लुटू लागतात. अशा प्रकारे बाप-लेकाची ही केमिस्ट्री चाहत्यांना फार आवडली आहे. अनेक चाहते बाप-लेकाच्या या नात्याला कोणाची नजर ना लागो, असे म्हणत आहेत. त्यावर युजर्सनीही आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिले की, अरे अबराम शाहरुखला सांगतोय की, मी बोललेलो ना हा आऊट होईल. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, किती गोड दिसतायत दोघेही. तिसऱ्या युजरने लिहिले की, या दोघांनाही कुणाची नजर लागायला नको.