Sourav Ganguly’s reaction about Hardik Pandya : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आयपीएल सामन्यांदरम्यान मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पंड्याची हुर्यो उडवल्याने संतापला आहे. गांगुली हा दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीचा संचालक आहे. त्याचा संघ रविवारी (७ एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. गांगुली अशा लोकांपैकी नाही जे गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ करतात. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याने हार्दिक, रोहित शर्मा आणि दिल्ली कॅपिटल्सशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. तसेट संघ मालकांनी मुंबईला ५ वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला. यानंतर हार्दिकला आपले भव्य स्वागत होईल, अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. मुंबई इंडियन्सच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात त्याला जोरदार धक्का बसला. याआधी अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सच्या माजी संघाविरुद्धच्या सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी हार्दिकची हुर्यो उडवली होती.
हार्दिकची हुर्यो उडवू नये : गांगुली
सौरव गांगुलीला हार्दिकबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने मनमोकळे उत्तर दिले. गांगुली म्हणाला की, “त्याला मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद देण्यात आले यात हार्दिकची चूक नाही. संघमालकांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांनी हार्दिक पंड्याची हुर्यो उडवू नये. हे योग्य नाही. फ्रँचायझीने त्याची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. खेळात असेच घडते, मग तुम्ही भारतीय संघाचे कर्णधार असो किंवा कोणत्या फ्रेंचायझीचा कर्णधार असो. आता कर्णधारपदी नियुक्ती झाली आहे.”
हेही वाचा – RR vs RCB : ‘आजा-आजा… ऐसा मौका फिर कहा मिलेगा…’, विराट कोहलीने आवेश खानची घेतली मजा; पाहा VIDEO
सौरव गांगुलीने रोहितचे केले कौतुक –
दरम्यान, सौरव गांगुलीने मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले आहे. तो म्हणाला, “रोहित शर्माचा क्लास वेगळा आहे. या फ्रँचायझीसाठी त्याची कामगिरी, भारतासाठी कर्णधार आणि खेळाडू म्हणून त्याची कामगिरी एका वेगळ्या पातळीवर आहे. हार्दिकची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली ही त्याची चूक नाही.” रोहित शर्मा सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आगामी टी-२० विश्वचषक खेळणार आहे.