मुंबईविरुद्ध चेन्नई सामन्याला शनिवारी सनसनाटी सुरुवात झाली. अंपायर विनीत कुलकर्णींनी सचिनला वादग्रस्त पायचीत दिले. खूप दिवसांनी सचिन भडकलेला पाहिला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रसह झाला आहे, हे पुण्याचे विनीत कुलकर्णी विसरले. चालायचं.
दिनेश कार्तिक, रोहित शर्मा, अंबाती रायडू, कॅरन पोलार्ड हा मुंबईचा बॅटिंग न्यूक्लिअस आश्वासक वाटतो. कार्तिकचे पैलवानी चालणे हळूहळू त्याच्या फलंदाजीत उतरायला लागले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. रोहित शर्मा हे कधीही न सुटणारे कोडे आहे. इतका प्रतिभावान खेळाडू कधी शिस्तीचा, कधी समर्पणाचा तर कधी नशिबाच्या अभावामुळे अजून गोते खातो आहे. तो बॅटिंगमध्ये चालतो, तेव्हा अनुभवी आणि होतकरू दोन्ही प्रकारचे खेळाडू आ वासून बघत राहतात. टायमिंग, बॅटस्वींग, फॉलो थ्रू सगळंसगळं डोळ्याचे पारणे फेडणारे. पण, स्कोअरबुकमध्ये भरीव आकडा फार क्वचित. मुंबई क्रिकेटचे पालक अत्यंत सुजाण आणि समंजस असल्याने त्यांनी त्याला क्लिक व्हायला खूप वेळ दिला आहे. त्याबद्दल मुंबई क्रिकेटचे अभिनंदन! अन्यथा सर्वोत्तम वाया गेलेली प्रतिभा म्हणून रोहित कधीच इतिहासजमा झाला असता.
पोलार्ड या वेस्ट इंडियन महाकायबद्दल काय बोलावे. शनिवारची रात्र फक्त त्याची होती. हाताचे कोपर ते मनगट एवढ्याच भागाचा उपयोग करून (खाद्यांचा कमीत कमी वापर) तो इतके सहज, इतके लांबलाब सिक्सर कसे मारू शकतो आणि प्रत्येकवेळेस बॉल आरपार जाण्याचा आत्मविश्वास त्याच्याकडे कुठून येतो. एखादी मॅच परमेश्वराने एखाद्या खेळाडूला डोळ्यासमोर ठेवून आखलेली असते. तसा काल पोलार्डच्या पत्रिकेत राजयोग होता. त्याने सीमारेषेवर धोनीचा घेतलेला झेल म्हणजे पुरणपोळीवरचे तूप होते. पोलार्डची बॉलिंग ऍक्शन तुम्ही बघितली? अशा लालित्यपूर्ण ऍक्शनचा वेस्ट इंडिज लोकांमध्ये जीन असावा. नाहीतर स्टम्पपाशी सगळ्यांचीच ऍक्शन इतकी समान आणि शैलीदार कशी होईल. तात्पर्य, पोलार्ड मुंबईचा तारणहार ठरला. फक्त पेटीतला हापूस उन्हाळा संपल्यानंतर बाहेर काढून काय उपयोग, हे आंबेबाज मुंबईकरांना सांगायला लागू नये.
धोनीने पुन्हा निर्विकारपणे मॅच हातात आणली होती. दबावाखाली मॅच जिंकून देणारा त्याच्या सारखा खेळाडू भारतात झाला नाही. त्याला फिनिशर म्हणणे अन्यायकारक आहे. तो तीन, चार नंबरला येऊनही शेवटपर्यंत थांबून कसलाही गाजावाजा न करता मॅच जिंकून देऊ शकतो. (वर्ल्डकप फायनल आठवतेय?)
कालच्या सामन्यातला मनोरंजनाचा भाग आयपीएलला साजेसा होता. ब्राव्होचा कॅलिप्सो डान्स, धोनी आणि पोलार्डमधला हुलकावणीचा खेळ, पॉटिंग मुनाफशी बोलतोय पण त्यातली अडचण लक्षात घेऊन चटकन पळत येऊन सचिनने निभावलेली दुभाषकाची भूमिका, डिशला मस्त आणि लज्जतदार बनवून गेली.
sachoten@hotmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा