CSK vs SRH IPL 2025 Match Highlights in Marathi: सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करत मोठा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हैदराबादने चेन्नईवर ५ विकेट्स आणि ८ चेंडू शिल्लक ठेवत विजयाची नोंद केली. हैदराबादने आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईचा चेपॉकवर पराभव केला आहे. फॉर्मात नसलेल्या नितीश रेड्डीने आणि कामिंदू मेंडिसने अखेरच्या षटकांमध्ये संघाला विजयापर्यंत नेलं. या विजयासह हैदराबादचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी पोहोचला आहे.

गुणतालिकेत अखेरच्या क्रमांकावर असलेल्या चेन्नई आणि हैदराबादमध्ये हा सामना खेळवला गेला. दोन्ही संघांसाठी या सामन्यातील विजय होता आणि हैदराबादने विजय आपल्या दिशेने वळवला. या हंगामात सनरायझर्सचा ९ सामन्यांतील हा तिसरा विजय आहे आणि संघ पॉइंट्स टेबलमध्ये ९व्या स्थानावरून ८व्या स्थानावर पोहोचला आहे. चेन्नईचा हा इतक्याच सामन्यांमधील सातवा पराभव आहे आणि संघ दहाव्या क्रमांकावर कायम आहे.

सनरायझर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत संघाला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर युवा फलंदाज आयुष म्हात्रेने जोरदार फटकेबाजी केली पण तोही पॉवरप्लेमध्ये बाद झाला आणि चेन्नईने फक्त ४७ धावांत ३ विकेट गमावल्या.

यानंतर चेन्नईसाठी पदार्पण करणाऱ्या युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसने संथ सुरुवातीनंतर आक्रमक फलंदाजी करत षटकारांचा पाऊस पाडला. पण कामिंदू मेंडिसच्या थक्क करणाऱ्या झेलमुळे तो पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर, हर्षल पटेल आणि पॅट कमिन्स यांनी संघाला लवकर धावा करू दिल्या नाहीत आणि संघ १९.५ षटकांत १५४ धावांवर ऑलआउट झाला.

चेन्नईने दिलेल्या १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरूवातही फारशी चांगली झाली नाही. अभिषेक शर्माही खाते न उघ़डता पहिल्याच षटकात झेलबाद झाला. यानंतर ट्रॅव्हिस हेडही पॉवरप्लेच्या अखेरच्या षटकात झेलबाद झाला. यानंतर जडेजाने क्लासेनला झेलबाद केलं. इशान किशनने मधल्या षटकांमध्ये वादळी फलंदाजी करत संघासाठी महत्त्वपूर्ण धावा केल्या आणि ४४ धावांवर झेलबाद झाला.

यानंतर अनिकेत वर्मा १९ धावा करत १४व्या षटकात बाद झाला. पण कामिंदू मेंडिस आणि नितीश रेड्डीने संघाला विजयापर्यंत नेले. कामिंदू मेंडिस २२ चेंडूत ३ चौकारांसह ३२ धावा करत नाबाद राहिला. तर नितीश रेड्डीने २ चौकारांसह १९ धावा करत चांगली साथ दिली. यासह हैदराबादने १८.४ षटकांत १५५ धावा करत सामन्यात शानदार विजय मिळवला.