IPL 2025 SRH vs PBKS Match Highlights in Marathi: अभिषेक शर्माच्या झंझावाती शतकाच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद संघाने २४६ धावांचं डोंगराएवढं लक्ष्य सहजी पार करून दाखवलं. आयपीएलच्या इतिहासात धावांचा पाठलाग करतानाची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. या विक्रमी विजयाचा केंद्रबिंदू ठरला युवा डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्मा. अभिषेकने पंजाबच्या गोलंदाजांच्या ठिकऱ्या उडवत अवघ्या ४० चेंडूतच शतक गाठलं. अभिषेकने ५५ चेंडूत १४१ धावांची अविश्सनीय खेळी साकारली. अभिषेक आणि ट्रॅव्हिस जोडीने १२.२ षटकात १७१ धावांची तडाखेबंद सलामी दिली. या भागीदारीनेच हैदराबादच्या विजयाचा पाया रचला. अभिषेकच्या खेळीने असंख्य विक्रम मोडीत निघून नवे रचले गेले. हैदराबादने ८ विकेट्स आणि ९ चेंडू राखून हा सामना जिंकला.
२४६ धावांचं प्रचंड लक्ष्य समोर असताना अभिषेक आणि ट्रॅव्हिस जोडीने पहिल्या चेंडूपासून चौकार, षटकारांची बरसात केली. अभिषेकने सूत्रधाराची भूमिका स्वीकारत पंजाबच्या गोलंदाजांना निष्प्रभ ठरवलं. वेगवान गोलंदाज असोत की फिरकीपटू अभिषेक फटके लगावत गेला, ते चौकार-षटकार होत गेले. हेडनेही हात धुवून घेत फटकेबाजी केली. १३व्या षटकात युझवेंद्र चहलला मोठा फटका खेळताना हेड बाद झाला. त्याने ३७ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. हेड बाद झाल्यावर अभिषेकने आणखी आक्रमक पवित्रा स्वीकारत पंजाबला पुनरागमनाची संधी मिळणार नाही याची काळजी घेतली. ५५ चेंडूत १४ चौकार आणि १० षटकारांसह १४१ धावांची मॅरेथॉन खेळी साकारून अभिषेक परतला तेव्हा हैदराबादच्या विजयाची औपचारिकता बाकी उरली होती. पंजाबचा प्रमुख गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे केवळ दोनच चेंडू टाकून ड्रेसिंगरुममध्ये परतला. दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्याने लॉकी पुन्हा गोलंदाजीला आला नाही.
हैदराबादच्या संघाने पंजाब किंग्सने दिलेल्या २४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेगळ्याच गतीने फलंदाजी केली. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी १७५ धावांची भागीदारी रचत अनोखी सुरूवात करून दिली. तर अभिषेक शर्मान आयपीएल इतिहासातील त्याचे पहिलं शतक झळकावलं. ट्रॅव्हिस हेड ३७ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह ६६ धावा करत झेलबाद झाला. हेड आणि अभिषेकची सलामी जोडी काय धुमाकूळ घालू शकते याचा प्रत्यय पाहायला मिळाला. विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणाऱ्या हैदराबादचा संघाचं पुन्हा एकदा रौद्ररूप पाहायला मिळालं. तर पंजाबचा संघ फक्त २ विकेट्स घेऊ शकला. अभिषेक शर्मा ५५ चेंडूत १४ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने १४१ धावा करत झेलबाद झाला.
तर पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला आणि वादळी फलंदाजीसह २४६ धावांचा डोंगर उभारला. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी संघाला वादळी सुरूवात करून दिली. संघाने पॉवरप्लेमध्येच ८० धावांचा पल्ला गाठला होता. प्रियांश आर्यने १३ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. तर प्रभसिमरन सिंग २३ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ४२ धावा करू शकला. यांनतर श्रेयस अय्यरने ३६ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली. तर नेहल वढेरा २७ धावा आणि स्टॉयनिसने ११ चेंडूत ४ षटकार आणि एका चौकारासह ३४ धावा केल्या.
स्टॉयनिसने अखेरच्या चेंडूवर शमीच्या गोलंदाजीवर ४ षटकार लगावत संघाची धावसंख्या २४५वर नेऊन ठेवली. पण अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडच्या वादळी फटकेबाजीपुढे पंजाब किंग्सच्या फलंदाजांची मेहनत वाया गेली आणि अखेरीस हैदराबादने ऐतिहासिक विजय मिळवला.