SRH vs RR IPL 2025 Match Updates in Marathi: सनरायझर्स हैदराबादने पुन्हा एकदा आयपीएलमध्ये आपल्या झंझावाती फलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. इशान किशनचे वादळी शतक आणि अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांच्या वादळी सुरूवातीनंतर हैदराबादचं रौद्ररूप पुन्हा पाहायला मिळालं. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या इशान किशनने शतकी खेळी खेळत नाबाद परतला.
सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटकांत म्हणजेच १२० चेंडूंत ६ विकेट्स गमावत २८६ धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादच्या टॉप फलंदाजी फळीने रौद्ररूप धारण करत राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या २८७ धावा आहे, जी देखील सनरायझर्स हैदराबादच्या नावावर आहे. स्वत:चा विक्रम मोडण्यापासून हैदराबादचा संघ केवळ १ धाव मागे राहिला. यासह आयपीएल इतिहासातील ३ मोठ्या धावसंख्या उभारण्याचा विक्रम आता सनरायझर्स हैदराबादच्या नावावर आहे.
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी पाचारण झाल्यावर स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हैदराबादने आपले रंग दाखवले आणि समोरच्या संघाच्या तोंडचं पाणी पळवलं. अभिषेक शर्मा ११ चेंडूत ५ चौकारांसह २४ धावा करून बाद झाला. यानंतर सर्वच संघांसाठी डोकेदुखी असणारा ट्रॅव्हिस हेडने वादळी फलंदाजीचा प्रत्यय पुन्हा दाखवून दिला. हेडने ३१ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह ६७ धावा केल्या आणि तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. यानंतर इशान किशनच्या वादळाने राजस्थानला पळता भुई थोडी केली.
इशान किशनने आधी ४५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यानंतर इशान किशन नाबाद परतला आणि त्याने ४७ चेंडूंत ११ चौकार आणि ६ षटकारांसह झंझावाती १०६ धावांची खेळी केली. सनरायझर्स हैदराबादसाठी पदार्पणातच त्याने पहिलं शतक झळकावलं. यानंतर नितीश कुमार रेड्डीने १५ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह ३० धावा करत बाद झाला. यानंतर हेनरिक क्लासेननेही आपला क्लास दाखवला. क्लासेन १४ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ३४ धावा केल्या.
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजी विभागाने चांगलंचं निराश केलं. फजलहक फारूकी, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, नितीश राणा आणि महिश तीक्ष्णा असे गोलंदाज आहेत. पण सर्वांची चांगलीच धुलाई केली. सर्वात जास्त धावा बेस्ट गोलंदाज जोफ्रा आर्चरविरूद्ध सर्वाधिक धावा केल्या. जोफ्रा आर्चरला ४ षटकांत एकही विकेट मिळाली नाही आणि ७६ धावा दिल्या. यानंतर ३ षटकांत फजलहक फारूकीने ४९ धावा दिल्या आणि एकही विकेट दिली नाही. महिश तीक्ष्णाला ४ षटकांत २ विकेट मिळाले आणि त्याने ५२ धावा दिल्या. संदीप शर्माने १ विकेट घेत ५१ धावा दिल्या. तर तुषार देशपांडेने ३ विकेट घेत ४४ धावा दिल्या.