Sunrisers Hyderabad Threatens To Move Out Of Hydrabad: पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान त्यांचे होम ग्राउंड बदलण्याचा विचार करत आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे वरिष्ठ अधिकारी मोफत तिकिटांसाठी धमकी आणि ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप सनरायझर्सने केला आहे.

सनरायझर्स हैदराबादचे जनरल मॅनेजर श्रीनाथ टीबी यांनी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे कोषाध्यक्ष सीजे श्रीनिवास राव यांना पत्र लिहून स्पष्ट केले आहे की, फ्रँचायझी अशा प्रकारचे वर्तन सहन करणार नाही. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

यावेळी श्रीनाथ टीबी यांनी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या धमक्यांवर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. श्रीनाथ यांनी स्पष्ट केले आहे की, “जर सर्वकाही सुरळीत झाले नाही तर संघ हे ठिकाण सोडून जाईल. त्यांनी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला असेही सांगितले आहे की, त्यांना जर आम्हाला इथे खेळू द्यायचे नसेल तर त्यांनी याबाबत बीसीसीआय आणि तेलंगणा सरकारला लेखी स्वरूपात कळवावे. जर त्यांना काही अडचण असेल तर आम्ही हे ठिकाण सोडून दुसरीकडे जाऊ.”

“आम्ही गेल्या १२ वर्षांपासून एचसीएसोबत काम करत आहोत. गेल्या हंगामापासूनच आम्हाला एचसीएकडून सतत त्रास आणि छळ सहन करावा लागत आहे,” असे ते पुढे म्हणाले.

श्रीनाथ यांनी मेलमध्ये असेही म्हटले आहे की, “गेल्या काही वर्षांपासून आम्ही हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला ५० मोफत तिकिटे देत आहोत. जी एफ १२ ए बॉक्सची आहेत. हे ३९०० मोफत तिकिटांचा भाग आहे. पण यावर्षी त्याने सांगितले की, बॉक्सची क्षमता फक्त ३० आहे आणि त्यांना आणखी २० मोफत तिकिटे पाहिजेत. जेव्हा आम्हाला याबद्दल कळले तेव्हा आम्ही यावर आवाज उठवला.”

श्रीनाथ असेही म्हणाले की, “आम्ही स्टेडियमचे भाडे देत आहोत. पण गेल्या सामन्यात (हैदराबाद वि. लखनऊ) या लोकांनी एफ ३ बॉक्सला कुलूप लावले आणि सांगितले की, त्यांना आणखी २० मोफत तिकिटे मिळेपर्यंत ते कुलूप उघडणार नाहीत. आम्ही अशा प्रकारची वागणूक सहन करणार नाही. गेल्या दोन वर्षांपासून आम्हाला धमक्या येत आहेत. आम्ही हैदराबाद क्रिकेट असोसिएशनबरोबर केलेल्या करारात १० टक्के मोफत तिकिटांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, आम्हाला वाटते की बीसीसीआयने लवकरात लवकर हस्तक्षेप करावा आणि यावर कारवाई करावी.”

सनरायझर्स हैदराबादने सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या १८ व्या हंगामात दोन सामने खेळले आहेत. पॅट कमिन्सच्या संघाने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला, तर यजमान संघ लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पराभूत झाला होता.