Nitish Kumar Reddy Catch Video Viral : सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू नितीश कुमार रेड्डी याने आयपीएलच्या या हंगामात खूप प्रभावित केले आहे. एकीकडे त्याने फलंदाजीत चमक दाखवली, तर दुसरीकडे क्षेत्ररक्षणातही तो उत्कृष्ट कामगिरी करताना दिसला आहे. बुधवारी हैदराबाद स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात नितीश रेड्डीने शानदार झेल घेत प्रेक्षकांना चकीत केले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही घटना लखनऊ सुपर जायंट्सच्या डावातील तिसऱ्या षटकातच पाहायला मिळाली. भुवनेश्वर कुमारने पहिला चेंडू एलएसजीचा सलामीवीर क्विंटन डी कॉकला टाकला, तेव्हा त्याने त्याच्या आवडत्या पिकअप शॉटने तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला. यानंतर सीमारेषेवरील क्षेत्ररक्षक नितीश कुमार रेड्डीने उंच उडी मारली आणि दोन्ही हातांनी तो पकडण्याचा प्रयत्न केला.

नितीश कुमार रेड्डीने घेतला अप्रतिम झेल –

जेव्हा तो उडी मारल्यानंतर खाली येऊ लागला, तेव्हा त्याचा समतोल बिघडू लागला आणि त्याचा पाय सीमारेषेवर गेला. पण शहाणपणा दाखवत त्याने लगेच चेंडू आत फेकला. त्यानंतर तो स्वतः सीमारेषेच्या आतून बाहेर गेला. त्यानंतर पुन्हा आत येत शानदार झेल पूर्ण केला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नितीश कुमार रेड्डीच्या कौतुक होत आहे. नितीश कुमार रेड्डीने या हंगामात आपल्या फलंदाजीने प्रभावित केले आहे. नितीशने ८ सामन्यात २३९ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ४७.८० आहे. तर स्ट्राइक रेट १५० च्या वर आहे. यात दोन अर्धशतकांचाही समावेश आहे.

हेही वाचा – Babar Azam : ‘जर बाबरने टी-विश्वचषकात समोर सलग ३ षटकार मारले तर…’, माजी क्रिकेटपटूने कर्णधाराला दिलं खुलं आव्हान

सनवीर सिंगनेही घेतला उत्कृष्ट झेल –

नितीश कुमार रेड्डीनंतर सनवीर सिंगनेही उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. सनवीरने पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मार्कस स्टॉइनिससारख्या महत्वाच्या खेळाडूला तंबूत पाठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भुवनेश्वर कुमारचा चेंडू मार्कसने लेग साइडकडे मारला. ज्यावर सनवीरने डायव्हिंग करत उत्कृष्ट झेल घेतला. या सामन्यात सनवीरच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे मार्कसला अवघ्या ३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srh vs lsg match nitish reddy takes stunning catch near the boundary to send back quinton de kock video viral vbm