Ishan Kishan Wicket, SRH vs MI: आयपीएल २०२५ स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात अजब गजब घटना घडली. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात इशान किशन आऊट नसतानाही मैदानाबाहेर गेला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाताच इशान किशनने पॅव्हेलियनची वाट धरली. दीपक चाहरने चेंडू टाकल्यानंतर अपीलही केली नव्हती. तरीही इशान किशन मैदानाबाहेर गेला. त्यानंतर सोशल मीडियावर फिक्सिंग हॅशटॅग ट्रेन्ड होऊ लागला आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स सामन्यातील तिसऱ्या षटकात घडली. त्यावेळी दीपक चाहर गोलंदाजी करत होता, तर इशान किशन स्ट्राइकवर होता. दीपक चाहरने लेग साईडच्या दिशेने चेंडू टाकला. या चेंडूवर इशान किशनने फाईन लेगच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न केला. अंपायर वाईड देण्याच्या तयारीत होते, इतक्यात इशान किशनने क्रिझ सोडलं. त्यामुळे अंपायरला आपला निर्णय बदलावा लागला. मुख्य बाब अशी की, अंपायरने आऊट घोषित करण्याआधी दीपक चाहरने अपील केली नव्हती. इशान मैदान सोडून जात असताना हार्दिक पंड्यालाही आश्चर्याचा धक्का बसला.
सोशल मीडियावर फिक्सिंगचे आरोप
फलंदाज अनेकदा बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात असताना संताप व्यक्त करताना दिसून येतात. मात्र इशान किशनच्या बाबतीत असं काहीच घडलं नाही. इशान किशन हसताना दिसून आला. त्यानंतर खेळभावना दाखवल्यामुळे, हार्दिक पंड्या आणि मुंबईच्या खेळाडूंनी इशान किशनची पाठ थोपटली. त्यानंतर इशान मैदानाबाहेर गेला आणि स्निको मीटरमध्ये पाहिलं असता, स्पष्टपणे दिसून आलं की चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क झाला नव्हता. या विकेटनंतर सोशल मीडियावर फिक्सिंगचे आरोप करायला सुरूवात केली आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धेत इशान किशनची फ्लॉप कामगिरी सुरूच
इशान किशन गेली काही वर्ष मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत होता. मात्र, आयपीएल २०२५ स्पर्धेपू्र्वी त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने त्याला आपल्या संघात घेतलं. हैदराबादकडून खेळताना पहिल्याच सामन्यात त्याने शानदार शतकी खेळी केली. मात्र या खेळीनंतर पुढील ७ डावात त्याला अवघ्या ३३ धावा करता आल्या आहेत. यादरम्यान त्याने ५.५ च्या सरासरीने आणि ८६.८४ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादने पावरप्लेच्या षटकांमध्ये निराशाजनक सुरूवात केली. ६ षटकात हैदराबादला ४ गडी बाद अवघ्या २४ धावा करता आल्या.