एunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore Match Updates: आयपीएल २०२३ मधील ६५ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु संघात खेळला जात आहे. या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना हेनरिक क्लासेनने झंझावाती शतकाच्या जोरावर २० षटकांत ५ बाद १८६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु १८७ धावांचे लक्ष्य दिले आहे.
हेनरिक क्लासेनने झळकावले वादळी शतक –
हेनरिक क्लासेनने ५१ चेंडूत १०४ धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ८ चौकार आणि ६ षटकार मारले. याशिवाय हॅरी ब्रूकने १९ चेंडूत २७ धावांचे योगदान दिले. मात्र, याशिवाय सनरायझर्स हैदराबादच्या उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. सलामीवीर अभिषेक शर्माने ११ तर राहुल त्रिपाठीने १५ धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामने २० चेंडूत १८ धावा केल्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे तर, मायकेल ब्रेसवेलने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. शाहबाज अहमद व्यतिरिक्त हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज यांना १-१ विकेट घेतली. यापूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता
पॉइंट टेबलमध्ये सनरायझर्स हैदराबाद कुठे आहे?
पॉइंट टेबलमध्ये सनरायझर्स हैदराबाद शेवटच्या स्थानावर आहे. तसेच एडेन मार्करामचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आतापर्यंत या संघाने १२ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये केवळ ४ विजय मिळवता आले आहेत, तर ८ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशाप्रकारे सनरायझर्स हैदराबाद ८ गुणांसह १० व्या क्रमांकावर आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेऑफमध्ये पोहोचू शकेल का?
मात्र, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत, ज्यात ६ सामने जिंकले आहेत, तर ६ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशाप्रकारे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १२ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर कायम आहे. तथापि, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजयाची नोंद करावी लागेल.