Steve Smith to participate in IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ च्या लिलावात स्टीव्ह स्मिथ विकला गेला नव्हता. त्यानंतर त्याने आयपीएल २०२३ च्या लिलावासाठी आपले नाव दिले नाही. आयपीएलमध्ये पुणे सुपरजायंट आणि राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणारा स्मिथ आयपीएल २०२३ चा भाग असेल. स्मिथने स्वत: त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
खरं तर, आयपीएल २०२३ मध्ये स्मिथ मैदानावर खेळताना दिसणार नाही, तर खेळणाऱ्या खेळाडूंवर टिप्पणी करताना दिसणार आहे. स्टीव्ह स्मिथ आयपीएल २०२३ समालोचन पॅनेलचा एक भाग आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्मिथ म्हणाला, “नमस्ते इंडिया! माझ्याकडे तुमच्यासाठी एक रोमांचक बातमी आहे, मी आयपीएल २०२३ मध्ये सामील होत आहे. होय, बरोबर आहे, मी आयपीएल २०२३ मध्ये पूर्णपणे वेगळ्या संघात सामील होत आहे.”
स्टीव्ह स्मिथची आयपीएल कारकीर्द –
स्टीव्ह स्मिथ हा क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे यात शंका नाही. पण त्याच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर या व्यासपीठावर तो काही विशेष करू शकला नाही. हेच कारण आहे की दिल्ली कॅपिटल्सने त्याला आयपीएल २०२१ मध्ये जोडल्यानंतर आयपीएल २०२२ पूर्वी त्याला मुक्त केले. यानंतर तो मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला. अखेर तो आता आयपीएलपासून दूर झाला आहे. २०२१ च्या हंगामात त्याने ८ सामन्यात केवळ १५२ धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी २५.३३ आणि स्ट्राइक रेट ११२ आहे.
स्मिथने एकूण १०३ आयपीएल सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ३४.५१च्या सरासरीने आणि १२८.०९ च्या स्ट्राइक रेटने एकूण २४८५ धावा केल्या आहेत. स्मिथच्या नावावर आयपीएलमध्ये एक शतक आणि ११ अर्धशतकं आहेत.
हेही वाचा – IPL 2023 Trophy: आयपीएल ट्रॉफीवर संस्कृतमध्ये काय लिहिलेले असते, माहीत आहे का? खूपच प्रेरणादायी आहे अर्थ
वास्तविक, इंडियन प्रीमियर लीगचा १६वा सीझन ३१ मार्चपासून सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता गुजरात टायटन्स आणि यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर शुक्रवारी दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार आहे.