२४ चेंडूत अवघ्या २ धावा हव्या असताना झटपट सामना संपवण्याऐवजी स्ट्रॅटेजिक ब्रेक घेतला जातो. हे फक्त आयपीएलमध्येच होऊ शकतं असं इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने म्हटलं आहे. लखनौ सुपरजायंट्स संघाने गुरुवारी झालेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादने दिलेलं १९२ धावांचं लक्ष्य १६ षटकातच गाठलं. लखनौने निकोलस पूरन आणि मिचेल मार्शच्या खेळीच्या बळावर विक्रमी षटकात हे लक्ष्य पूर्ण केलं. लक्ष्य २ धावा दूर असताना स्पर्धेच्या नियमानुसार स्ट्रॅटेजिक टाईमआऊट घेण्यात आला. मायकेल वॉनने यावर खरमरीत शब्दात टीका केली आहे.

इमोजींचा वापर करत वॉनने या वेळकाढूपणावर टीका केली आहे. २४ चेंडूत आहेत, केवळ २ धावा हव्या आहेत आणि ५ विकेट्स बाकी आहेत. तरीही ब्रेक फक्त आयपीएल स्पर्धेतच घेतला जाऊ शकतो असं वॉनने एक्स अकाऊंटवर म्हटलं आहे. १९ हजारहून अधिक लोकांनी वॉनच्या म्हणण्याला पसंती दिली आहे. मात्र त्याचवेळी हा व्यावहारिक भाग असल्याने तो ब्रेक घेतला जाणारच असंही काहींनी सुनावलं आहे.

आयपीएल स्पर्धेदरम्यान प्रत्येक डावात १ असे सामन्यात २ स्ट्रॅटेजिक ब्रेक घेतले जातात. या काळात संघाचे प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ मैदानात येऊन रणनीती संदर्भात कर्णधार आणि संघाशी चर्चा करतात. गोलंदाजी करणारा संघ ६ ते ९ षटकादरम्यान स्ट्रॅटेजिक ब्रेक घेतो. फलंदाजी करणारा संघ १३ ते १६ षटकांच्या दरम्यान हा ब्रेक घेतो. संघाने स्ट्रॅटेजिक ब्रेक घेतला नाही तर १६व्या षटकानंतर पंच ब्रेकची सूचना करतात. लखनौ-हैदराबाद सामन्यात २४ चेंडू बाकी असताना स्ट्रॅटेजिक ब्रेकचा निर्णय झाला. २ धावा हव्या असताना काय डावपेच ठरणार होते असं वॉन यांना सूचित करायचं होतं.

शार्दूल ठाकूरच्या ४ विकेट्सच्या बळावर लखनौने हैदराबादला १९१ धावांत रोखलं. ट्रॅव्हिस हेडने २८ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. निकोलस पूरनने २६ चेंडूत ७० धावांची झंझावाती खेळी केली. त्याने ७ चौकार आणि ६ षटकारांसह ही खेळी सजवली. त्याला मिचेल मार्शची तोलामोलाची साथ मिळाली. मार्शने ३१ चेंडूत ५२ धावा केल्या. लखनौनं २३ चेंडू शिल्लक राखून सामना खिशात टाकला. यामुळे त्यांचा नेट रनरेट अतिशय उत्तम झाला.