स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकामागून एक सलग पाच विजय नोंदवत राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. आता या अपराजित राजस्थानपुढे आव्हान असेल ते किंग्ज इलेव्हन पंजाबचे. राजस्थानच्या विजयांवर नजर टाकली तर अजिंक्य रहाणे हा संघासाठी मोलाची कामगिरी करताना दिसत आहे. त्यामुळे हा सामना जर पंजाबला जिंकायचा असेल तर त्यांना मिशन अजिंक्य हाती घ्यायला लागेल.
गेल्या चेन्नईविरुद्धच्या सामन्यात अजिंक्यबरोबर शेन वॉटसनने १४४ धावांची भागीदारी रचत संघाला विजय मिळवून दिला होता. आतापर्यंतच्या पाच सामन्यांमध्ये अजिंक्यने ५७.७५ च्या सरासरीने २३१ धावा फटकावल्या असून यावरून तो संघासाठी किती अमूल्य योगदान देतो हे समजू शकते. अजिंक्य हा राजस्थानच्या फलंदाजीचा कणा आहे. त्यांच्याकडे अजिंक्यबरोबरच वॉटसन, स्टीव्हन स्मिथसारखे दमदार फलंदाज आहे. गोलंदाजीमध्ये मुंबईकर प्रवीण तांबेने आपल्या फिरकीने साऱ्यांनाच प्रभावित केले आहे. त्याचबरोबर मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीही चांगली कामगिरी करत आहे. पण पाचपैकी चार सामन्यांमध्ये राजस्थानने धावांचा पाठलाग करताना विजय मिळवले आहेत. त्यामुळे त्यांची गोलंदाजीपेक्षा फलंदाजी अधिक सक्षम असल्याचे दिसत आहे. पंजाबचा संघ सातत्याने धडपडताना दिसत आहे. पंजाबच्या एकाही खेळाडूच्या कामगिरीमध्ये सातत्य दिसलेले नाही. वीरेंद्र सेहवाग आणि मुरली विजय या सलामीवीरांना अजूनपर्यंत संघाला चांगली सलामी देता आलेली नाही. ग्लेन मॅक्सवेलसारखा धडाकेबाज फलंदाज त्यांच्याकडे असला तरी त्याला अजूनही सूर गवसलेला नाही. कर्णधार जॉर्ज बेलीला अजूनही संघाला सामना जिंकवून देता आलेला नाही.
प्रतिस्पर्धी संघ
राजस्थान रॉयल्स: शेन वॉटसन (कर्णधार), अंकित शर्मा, ब्रेनडर स्रान, रजत भाटिया, स्टुअर्ट बिन्नी, बेन कटिंग, जेम्स फॉकनर, दीपक हुडा, धवल कुलकर्णी, विक्रमजीत मलिक, ख्रिस मॉरिस, करुण नायर, अभिषेक नायर, अजिंक्य रहाणे, प्रदीप साहू, दिनेश साळुंखे, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, टिम साऊदी, प्रवीण तांबे, राहुल टेवाटिया, रस्टी थेरॉन, सागर त्रिवेदी, दिशांत याग्निक.
किंग्ज इलेव्हन पंजाब: जॉर्ज बेली (कर्णधार), अनुरीत सिंग, परविंदर अवाना, रिशी धवन, योगेश गोळवलकर, गुरकीरत सिंग मान, ब्युआन हेन्ड्रिंक्स, मिचेल जॉन्सन, करनवीर सिंग, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर, निखिल नाईक, अक्षर पटेल, थिसारा परेरा, वृद्धिमान साहा, संदीप शर्मा, वीरेंद्र सेहवाग, शिवम शर्मा, शार्दूल ठाकूर, मुरली विजय, मनन व्होरा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा