आयपीएलच्या तेराव्या हंगामाला अवघ्या काही तासांमध्ये सुरुवात होणार आहे. १९ तारखेला अबु धाबी येथे गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. आयपीएल सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क मिळालेल्या Star Sports वाहिनीने यंदाच्या हंगामासाठी अँकर आणि प्रेझेंटर्सची यादी जाहीर केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या यादीत मयांती लँगरला स्थान देण्यात आलेलं नाही. गेल्या काही वर्षांपासून आयपीएल आणि इतर महत्वांच्या स्पर्धांमधून मयांती लँगरने आपली ओळख निर्माण केली होती. आपल्या सदाबहार शैलीत खेळाडूंच्या मुलाखती आणि अँकरिंग करताना सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते तयार झाले होते.

त्यामुळे यंदाच्या हंगामात ती दिसणार नसल्यामुळे अनेकांशी आश्चर्य व्यक्त केलं होतं. परंतू काही दिवसांपूर्वीच मयांतीने आपल्या बाळाला जन्म दिला आहे. स्टुअर्ट बिन्नीसोबत आपल्या मुलाचा फोटो शेअर करत मयांतीने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांनी दिली आहे.

मयांती लँगर यंदा उपलब्ध नसल्यामुळे, सुरेन सुंदरम, किरा नारायणन, सोहेल चांढोक, नशप्रीत कौर, संजना गणेशन, जतीन सप्रू, तान्या पुरोहित, अनंत त्यागी, धीरज जुनेजा आणि नेरोली मेडोव्ज यांना Star Sports वाहिनीने यंदा संधी दिली आहे.