भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्यासंबंधी केलेले सध्या चर्चेत आहे. बंगळुरू आणि पंजाबमधील सामन्यादरम्यान समालोचन करताना सुनील गावसकर यांनी विराटवर टीका करताना अनुष्काचाही उल्लेख केला होता. विराटची सुमार कामगिरी बघून गावसकर यांनी “लॉकडाउन था, तो सिर्फ अनुष्का के बॉलिंग की प्रॅक्टिस की इन्होंने” असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर काहींनी टीका केली. इतकंच नव्हे तर खुद्द अनुष्कानेदेखील गावसकर यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर या मुद्द्यावर चेन्नई वि. दिल्ली सामन्यात समालोचन करताना गावसकर यांनी त्यांची बाजू मांडली.

“मी विराटच्या अपयशासाठी अनुष्काला जबाबदार ठरवलं नाही. मी कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह टिप्पणी केलेली नाही. लॉकडाउनमध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये अनुष्का विराटला गोलंदाजी करत होती. त्याबद्दल बोलताना अनुष्काने विराटला गोलंदाजी केली असं मी म्हटलं होतं. त्यात मी अनुष्काला दोषी ठरवलं नव्हतं. लॉकडाऊन काळात विराटने एवढीच गोलंदाजी खेळली होती”, असंही गावसकर म्हणाले.

“ज्यांना माझ्या वक्तव्यावर आक्षेप असेल किंवा ज्यांना कोणाला माझं वक्तव्य खटकलं असेल, त्यांनी ती क्लिप नीट ऐका आणि मला सांगा की मी काय चुकीचं बोललो? मी अनुष्काला दोषी ठरवलं नाही. कोणतीही आक्षेपार्ह टिप्पणीही केलेली नाही. तुम्ही पुन्हा एकदा तो व्हिडीओ बघा. मी काय बोललो ते नीट ऐका मग हवं ते खुशाल बोला. शीर्षकांवर (हेडलाइन्सल) विश्वास ठेवू नका. स्वत: व्हिडीओ बघा. मी माझ्या भूमिकेबाबत साशंक नाही”, असं रोखठोक मत गावसकर यांनी मांडलं.