वेस्ट इंडिजचा जादुई फिरकी गोलंदाज सुनील नरिनवर संशयास्पद गोलंदाजीच्या शैलीचा पुन्हा ठपका ठेवण्यात आला असून आयपीएल स्पर्धेत यापुढे त्याला ‘ऑफ स्पिन’ चेंडू टाकता येणार नाही. सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्याप्रसंगी कोलकाता नाईट रायडर्स संघातर्फे खेळणाऱया सुनील नरिनची गोलंदाजी पुन्हा वादाच्या भोवऱयात सापडली होती. रिचर्ड इलिंगवर्थ आणि विनीत कुलकर्णी या दोन मैदानावरील पंचांनी नरिनची गोलंदाजीची शैली संशयास्पद असल्याचे अहवालात नमूद केले होते. यावर कारवाईकरत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) बुधवारी सुनील नरिनच्या ‘ऑफ स्पिन’ चेंडुवर बंदी आणली आहे. बीसीसीआयच्या या बंदीनुसार सुनील नरिन आयपीएलमध्ये खेळू शकतो मात्र त्याला आपल्या षटकात ‘ऑफ स्पिन’ चेंडू टाकता येणार नाही. ‘ऑफ स्पिन’ चेंडू नरिनने टाकल्यास तो ‘नो बॉल’ म्हणून घोषित करण्यात येईल, असेही बीसीसीआयने म्हटले आहे.  
नरिनच्या गोलंदाजी शैलीची चेन्नईमधील एका स्पोर्ट्स सायन्स सेंटरमध्ये जैव यांत्रिक विश्लेषण चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल आणि संबंधित सामन्याचे व्हिडिओ फुटेज बीसीसीआयच्या गोलंदाजी कृती समितीने तपासून पाहिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे बीसीसीआयने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. गोलंदाजी कृती समितीला नरिनच्या ‘ऑफ स्पिन’ टाकण्याची शैली संशयास्पद आढळून आली आहे.