आयपीएलच्या गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स संघाला जेतेपद कायम राखण्याच्या दृष्टीने दिलासा मिळाला आहे. त्यांचा प्रमुख गोलंदाज सुनील नरिवरील ऑफ स्पिन टाकण्याची बंदी मागे घेण्यात आली आहे. मात्र, यावेळी नरिनला अखेरची ताकिद देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या परवानगीमुळे नरिनला आता गोलंदाजी करण्याची मुभा असणार आहे. सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्याप्रसंगी कोलकाता नाईट रायडर्स संघातर्फे खेळणाऱया सुनील नरिनची गोलंदाजी पुन्हा वादाच्या भोवऱयात सापडली होती. रिचर्ड इलिंगवर्थ आणि विनीत कुलकर्णी या दोन मैदानावरील पंचांनी नरिनची गोलंदाजीची शैली संशयास्पद असल्याचे अहवालात नमूद केले होते. यावर कारवाईकरत बीसीसीआयने सुनील नरिनच्या ‘ऑफ स्पिन’ चेंडुवर बंदी आणली होती. यानंतर संघाच्या वतीने नरिनच्या गोलंदाजीची पुन्हा एकदा चाचणी घेण्यात यावी अशी विनंती बीसीसीआयकडे करण्यात आली होती. चेन्नईमधील स्पोर्ट्स सायन्स सेंटरमध्ये नरिनच्या गोलंदाजी शैलीची तिसऱयांदा जैव यांत्रिक विश्लेषण चाचणी करण्यात आली. यावेळी नरिनने आपल्या शैलीत योग्य ते बदल केल्याचे आढळून आले. या शैलीनुसार नरिनला गोलंदाजी करण्याची मुभा देण्यात येऊ शकते असा निष्कर्ष काढण्यात आला मात्र, नरिनला अखेर ताकीद देखील देण्यात आली आहे. त्यामुळे गोलंदाजीची परवानगी मिळाली असली तरी नियमांचा भंग करणाऱया सदोष शैलीने गोलंदाजी पुन्हा होणार नाही याची काळजी नरिनला घ्यावी लागणार आहे.

Story img Loader