बाद फेरीसाठी विजय आवश्यक असणाऱ्या सनरायझर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबवर ५ धावांनी निसटता विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नरच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर हैदराबादने १८५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना पंजाबने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या मात्र ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नाही याचा प्रत्यय देत डेव्हिड मिलरने एकहाती सामना फिरवण्याचा प्रयत्न केला. त्याने ४४ चेंडूत २ चौकार आणि ९ षटकारांसह नाबाद ८९ धावांची खेळी केली. मात्र ही खेळी पंजाबला विजय मिळवून देऊ शकली नाही. पंजाबने १८० धावा केल्या.
प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना मुरली विजय आणि मनन व्होरा यांनी सावध सुरुवात केली. बिपुल शर्माच्या फिरकीवर मुरली विजयने आपली विकेट गमावली. शिखर धवनने त्याचा सुरेख झेल टिपला. विजयने २४ धावा केल्या. बिपुलनेच व्होराला भुवनेश्वर कुमारकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने २० धावा केल्या. यंदाच्या हंगामात सपशेल अपयशी ठरलेला ग्लेन मॅक्सवेल या सामन्यातही जेमतेम पाच मिनिटे खेळपट्टीवर टिकला. ट्रेंट बोल्टच्या उसळत्या चेंडूवर यष्टीरक्षक नमन ओझाकडे झेल देऊन तो बाद झाला. त्याने ११ धावा केल्या. हेन्रिकेने साहा आणि जॉर्ज बेलीला बाद करत पंजाबच्या डावाला खिंडार पाडले. साहाने ५ तर बेलीने ६ धावा केल्या. गुरकीरतही हेन्रिकेची शिकार ठरला. डेव्हिड मिलरने एकहाती सामना जिंकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपुराच ठरला. अक्षर पटेलने धावा करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ४.५ षटकांत ५९ धावांची भागीदारी केली. भुवनेश्वर कुमारने पटेलला बाद केले. शेवटच्या षटकात २८ धावांची आवश्यकता असताना मिलरने २२ धावा फटकावल्या मात्र त्या पंजाबला विजयासाठी अपुऱ्याच ठरल्या. हैदराबादतर्फे हेन्रिकेने सर्वाधिक ३ बळी मिळवले.
तत्पूर्वी, डेव्हिड वॉर्नरच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या बळावर सनरायझर्स हैदाराबादने १८५ धावांचा डोंगर उभारला. घरच्या मैदानावर नाणेफेकजिंकून हैदराबादने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादचे आधारस्तंभ असलेल्या शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर जोडीने ५६ धावांची खणखणीत सलामी दिली. ग्लेन मॅक्सवेलच्या कामचलाऊ फिरकीवर आक्रमण करण्याचा धवनचा इरादा फसला. वृद्धिमान साहाने त्याला यष्टीचीत केले. धवनने २४ धावा केल्या. यानंतर वॉर्नरला मॉइझेस हेन्रिकेची साथ मिळाली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. गुरकीरत सिंगने हेन्रिकेला बाद करत ही जोडी फोडली. त्याने २८ धावा केल्या. ७ चेंडूत १७ धावांची वेगवान खेळी करून ईऑन मॉर्गन तंबूत परतला. ब्युऑन हेन्ड्रिंक्सने त्याला बाद केले. नियमित अंतरात सहकारी माघारी परतत असतानाही वॉर्नरने एका बाजूने आक्रमण सुरूच ठेवले. शतकाकडे कूच करणाऱ्या वॉर्नरचा झंझावात हेन्ड्रिंक्सनेच संपुष्टात आणला. त्याने ६ चौकार आणि ५ षटकारांसह ५२ चेंडूत ८१ धावांची वेगवान खेळी केली. लोकेश राहुलने १० चेंडूत १७ तर करण शर्माने ७ चेंडूत ११ धावा केल्या. किंग्ज इलेव्हन पंजाबतर्फे ब्युऑन हेन्ड्रिंक्सने २ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ५ बाद १८५ (डेव्हिड वॉर्नर ८१, मॉइझेस हेन्रिके २८, शिखर धवन २४, ब्युऑन हेन्ड्रिक्स २/४०) विजयी विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ७ बाद १८० (डेव्हिड मिलर ८९, मॉइझेस हेन्रिके ३/१६).
सामनावीर : डेव्हिड वॉर्नर
हैदराबादचा निसटता विजय
बाद फेरीसाठी विजय आवश्यक असणाऱ्या सनरायझर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबवर ५ धावांनी निसटता विजय मिळवला.
First published on: 12-05-2015 at 01:48 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunrisers hyderabad beat kings xi punjab