क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो, याचाच प्रत्यय ब्रेबॉर्न स्टेडियमवरील गुरुवारच्या सामन्यात क्रिकेटरसिकांना आला. सनरायझर्स हैदराबादचे अवघड आव्हान स्वीकारलेल्या राजस्थान रॉयल्सची १७.४ षटकांत ७ बाद १५७ अशी अवस्था झाली होती, तेव्हा हा सामना एकतर्फीच होण्याची लक्षणे दिसत होती. परंतु ख्रिस मॉरिसला हे नामंजूर होते. त्याने प्रवीण कुमारच्या १९व्या षटकात ‘हल्लाबोल’ केला आणि तीन सलग षटकारांसह संघाच्या धावफलकात २२ धावा जमा केल्या. त्यामुळे अखेरच्या षटकात विजयासाठी १८ धावांचे आव्हान राजस्थानपुढे होते. परंतु मॉरिसने स्टुअर्ट बिन्नीच्या साथीने केलेले प्रयत्न अपयशी ठरले. राजस्थानला फक्त ७ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे हैदराबादने १०व्या सामन्यातील पाचव्या विजयासह १० गुणांसह आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर मजल मारत बाद फेरीच्या आशा जिवंत राखल्या आहेत.
राजस्थानची सुरुवात खराब झाली. परंतु स्टीव्हन स्मिथने ४० चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावा करताना संघाचा डाव सावरण्याचा झुंजार प्रयत्न केला. त्याने जेम्स फॉल्कनर (३०) सोबत पाचव्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर मॉरिसने ११ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ३४ धावा करत सामन्याची रंगत अखेरच्या षटकापर्यंत टिकवून धरली.
त्याआधी, सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना शिखर धवन आणि ईऑन मॉर्गनच्या अर्धशतकांच्या बळावर ४ बाद २०१ असे तगडे आव्हान उभे केले. यापैकी धवनची खेळी संयमी होती, तर मॉर्गनची आक्रमक होती.
धवनने कप्तान डेव्हिड वॉर्नरच्या (२४) साथीने ४८ धावांची दमदार सलामी नोंदवली. परंतु वॉटसनने वॉर्नरचा अडसर दूर केला. मग धवनने मोझेस हेन्रिक्स (२०) आणि मॉर्गनसोबत भागीदाऱ्या करून ३५ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५४ धावांची खेळी साकारली. जेम्स फॉल्कनरने धवनचा त्रिफळा उडवून त्याची खेळी संपुष्टात आणली. मग मॉर्गनने अखेरच्या हाणामारींच्या षटकांमध्ये आक्रमक पवित्रा स्वीकारला. प्रवीण तांबेच्या १६व्या षटकात मॉर्गनने २ षटकार आणि एका चौकारासह १८ धावा केल्या, तर ख्रिस मॉरिसच्या १७व्या षटकात मॉर्गनने एक षटकार आणि दोन चौकारांसह एकंदर १९ धावा काढल्या. वॉटसनच्या १८व्या षटकात मॉर्गन स्टीव्हन स्मिथकडे झेल देऊन माघारी परतला. मॉर्गनने २८ चेंडूंत ४ चौकार आणि ५ षटकारांनिशी ६३ धावांची तडफदार खेळी साकारून क्रिकेटरसिकांना खूश केले. मॉर्गनने रवी बोपारा (नाबाद १७) सोबत चौथ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी रचली.
संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ४ बाद २०१ (शिखर धवन ५४, डेव्हिड वॉर्नर २४, ईऑन मॉर्गन ६३; शेन वॉटसन २/३६) विजयी वि. राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ७ बाद १९४ (स्टीव्हन स्मिथ ६८, जेम्स फॉल्कनर ३०, ख्रिस मॉरिस नाबाद ३४; भुवनेश्वर कुमार ३/४४)
सामनावीर : ईऑन मॉर्गन.
मॉर्गनचा धडाका!
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो, याचाच प्रत्यय ब्रेबॉर्न स्टेडियमवरील गुरुवारच्या सामन्यात क्रिकेटरसिकांना आला.
First published on: 08-05-2015 at 12:17 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunrisers hyderabad beat rajasthan royals by 7 runs in ipl