IPL 2025 Sunrisers Hyderabad Team Visit to Maldives Video: आयपीएल २०२५ चा हंगाम सनरायझर्स हैदराबादसाठी काही खास राहिलेला नाही. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. चेन्नई सुपर किंग्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केल्यानंतर संघ ब्रेकवर आहे. दरम्यान हैदराबादचा संपूर्ण संघ मालदीवला फिरायला गेला आहे. आतापर्यंत खेळलेल्या नऊ सामन्यांमध्ये हैदराबादला फक्त तीन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे आणि ते पॉइंट टेबलमध्ये आठव्या स्थानावर आहे.
गेल्या सामन्यात हैदराबादने पाच वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा पाच विकेट्सने पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जवरील विजयानंतर, व्यवस्थापनाने सपोर्ट स्टाफसह संपूर्ण संघाला मालदीवला सुट्टीवर पाठवण्याची व्यवस्था केली. हैदराबादचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ पुढील आठवड्यात भारतात परतणार आहेत. संघाचा पुढील सामना २ मे ला होणार आहे. २ मे रोजी अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध सामना होईल आणि या सामन्याच्या दोन ते तीन दिवस आधी मालदीवहून थेट अहमदाबादला पोहोचेल.
चेन्नईचा पराभव केल्यानंतर संघ मालदीवला पोहोचला आहे. संपूर्ण संघ टीम बॉन्डिंगसाठी त्यांच्या कुटुंबीयांसह मालदीवला गेला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने याचे फोटो शेअर केले आहेत. फ्रँचायझीने संघातील खेळाडूंच्या आगमनाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हैदराबादचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ पुढील आठवड्याच्या सुरुवातीला भारतात परतू शकतात.
शुक्रवारी चेपॉकच्या मैदानावर झालेल्या सामन्यात हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभवाची मालिका संपवली आणि यजमान संघाला पाच विकेट्सने हरवले. चेन्नईला १५४ धावांवर गुंडाळल्यानंतर, हैदराबादने ५ गडी गमावून १५५ धावा करून विजय मिळवला. वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने चेपॉकच्या खेळपट्टीवर उत्कृष्ट कामगिरी केली. हर्षलने २८ धावा देऊन ४ विकेट घेतले, त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजीही अपयशी ठरली आणि संघ १९.५ षटकांत फक्त १५४ धावांवर ऑलआउट झाला. दव पडलेल्या खेळपट्टीची मदत मिळूनही, हैदराबादने १९ व्या षटकात लक्ष्य गाठले.
फॉर्ममध्ये नसलेल्या इशान किशनने (३४ चेंडूत ४४) वरच्या फळीत जबाबदारीने खेळी केली, त्यानंतर कामिंदू मेंडिस (२२ चेंडूत नाबाद ३२) आणि नितीश कुमार रेड्डी (१३ चेंडूत नाबाद १९) यांनी ४९ धावांची भागीदारी करून संघाला दोन गुण मिळवून दिले. सनरायझर्स हैदराबाद संघाचा हा चेपॉकवर आयपीएलच्या १८ वर्षातील पहिला विजय होता.