‘आयपीएलमधील महाशक्ती’ असे बिरुद मिरवणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ आणि ख्रिस गेलसारखा महाफलंदाज दिमतीला असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ यांच्यात शनिवारी होणारी लढत रंगतदार होईल. कारण दोन्ही संघ आक्रमक, तितकेच फॉर्मात असलेले. मागील सामन्यात चेन्नईने किंग्ज इलेव्हन पंजाबला १० विकेट राखून हरवले, तर बंगळुरूने गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सला ८ विकेट राखून पराभूत केले.
चेन्नई आणि बंगळुरू दोन्ही संघ कागदावर मजबूत. पण गेल हा घटक सामन्याला कलाटणी देणारा. गेलने कोलकात्याविरुद्धच्या विजयात ८५ धावांची नाबाद खेळी साकारली होती. यात चार चौकार आणि नऊ टोलेजंग षटकारांचा समावेश होता. त्यामुळे बंगळुरूला १५ चेंडू शिल्लक असतानाच विजय प्राप्त करता आला होता. गेल नामक वादळाचे आव्हान सर्वच संघांवर आहे. बंगळुरूच्या खात्यावर आता चार सामन्यांत ३ विजय जमा आहेत. त्याला कप्तान विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज ए. बी. डी’व्हिलियर्सची छान साथ लाभत आहे.
चेन्नईकडेही असे दणकेबाज फटकेबाजी करणारे फलंदाज आहेत. मागील सामन्यात सलामीवीर मायकेल हसीने ५४ चेंडूंत ८६ धावा केल्यामुळे चेन्नईला सहज विजय मिळवता आला होता. सलामीवीर मुरली विजयसुद्धा चांगला फॉर्मात आहे. सलामीचा सामना गमावल्यानंतर दोन वेळा आयपीएल विजेता चेन्नईचा संघ अधिक ताकदीनिशी मैदानावर वावरत आहे.
सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असलेला कप्तान महेंद्रसिंग धोनी, अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो हे दोघे चेन्नईचे वैभव. त्याशिवाय सुरेश रैना, एस. बद्रिनाथ आणि रवींद्र जडेजा यांचेही महत्त्वाचे योगदान संघाला तारणारे ठरते. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू अ‍ॅल्बी मॉर्केलच्या दुखापतीचे स्वरूप अद्याप समजू शकले नाही.
गोलंदाजीच्या प्रांतात वेगवान गोलंदाज झहीर खानच्या अनुपस्थितीतसुद्धा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा गोलंदाजीचा मारा अधिक समर्थ आहे. विनय कुमारने संघाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. मुथय्या मुरलीधरन आणि मुरली कार्तिक यांच्यावर फिरकीची मदार आहे. चेन्नईकडे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज बेन लॉघलिन आणि अंकित राजपूत आहे. पण ऑफस्पिनर आर. अश्विन हा त्यांचा प्रमुख गोलंदाज आहे.
सामन्याची वेळ : दुपारी ८ वा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा