आयपीएलच्या १५ व्या हंगामाचा थरार येत्या २६ मार्चपासून रंगणार आहे. या वर्षी एकूण दहा संघांमध्ये लढत होणार आहे. गतविजेता संघ चेन्नई सुपरकिंग्जनेही ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी कंबर कसली असून चेन्नई संघ कसून सराव करताना दिसतोय. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान कर्णधार महेंद्रसिंह धोनीची जागा कोण घेणार याबद्दल क्रिकेटपटू सुरेश रैनाने काही खेळाडूंची नावे घेतली आहेत. धोनीनंतर चेन्नई संघाचा कर्णधार होण्याची कुवत रविंद्र जडेजा, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा, ड्वेन ब्राव्हो यांच्यात असून हे खेळाडू धोनीचा उत्तराधिकारी होण्यास पात्र आहेत, असं रैनाने म्हटलंय.
यंदाच्या हंगामात अनसोल्ड राहिल्यामुळे सुरेश रैना आता आयपीएल २०२२ मध्ये समालोचक म्हणून दिसणार आहे. यापूर्वी आयपीएलमध्ये रैनाने चैन्नई सुपर किंग्ज संघाकडून धडाकेबाज खेळ करुन दाखवलेला आहे. चेन्नईने आतापर्यंत चार वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकलेली असून या चारही हंगामात रैना या चेन्नई संघाचा भाग राहिलेला आहे. त्याने धोनीनंतर चेन्नई संघाचे कर्णधारपद कोण चांगल्या पद्धतीने भूषवू शकतो याबद्दल भाष्य केलं आहे. “रविंद्र जडेजा, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा, ड्वेन ब्राव्हो हे खेळाडू धोनीचा उत्तराधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळण्यास सक्षम आहेत, विशेषत: रविंद्र जडेजामध्ये संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे,” असं रैनाने म्हटलंय.
त्याचबरोबर रैना आता समालोचकाची भूमिका बजावणार असल्यामुळे त्यावरही त्याने सविस्तर भाष्य केलंय. समालोचन करणे सोपे नसून त्यासाठी मी तयारी केली आहे, असे रैनाने सांगितले आहे. “समालोचन करणे हे तसे अवघड काम आहे. मात्र मी त्यासाठी तयारी केलेली आहे. इरफान पठाण, हरभजन सिंग, पियुष चावला या माझ्या मित्रांनी यापूर्वी समालोचकाची भूमिका पार पाडलेली आहे. माझ्यासोबत रवी शास्त्रीदेखील असणार आहेत. त्यामुळे मला वाटतं की हे काम माझ्यासाठी सोपे होणार आहे. माझ्या या मित्रांकडून मी काही टिप्सदेखील घेणार आहे,” असं रैनाने म्हटलंय.