IPL 2025 Suryakumar Yadav and Ayush Mhatre Viral Photo: आयपीएलमधील एल क्लासिको सामना मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आज वानखेडेवर खेळवला जात आहे. या सामन्यात चेन्नईने १७ वर्षीय खेळाडूला पदार्पणाची संधी मिळाली. चेन्नईकडून मुंबईचा मराठमोळा खेळाडू आयुष म्हात्रेने आयपीएलमध्ये पदार्पणातच वादळी प्रभावी खेळी केली. पण तो छोटी खेळी करत झेलबाद झाला. तो बाद झाल्यानंतर सूर्यादादाच्या कृतीने सर्वांची मनं जिंकली.

१७ वर्षीय आयुष म्हात्रेने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची दमदार सुरुवात केली आहे. त्याने पहिल्याच चेंडूवर एक धाव घेऊन आपलं खातं उघडले. यानंतर, त्याने दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार लगावत आपलं कौशल्य दाखवून दिलं. या सामन्यात आयुष म्हात्रेने १५ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ४ चौकार आणि २ षटकार पाहायला मिळाले. विशेष म्हणजे आयुष म्हात्रेने २१३.३३ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या, ज्याची सीएसकेला खूप गरज होती आणि त्यांना पॉवरप्लेमध्ये चांगली सुरूवात करून दिली.

आयुष म्हात्रे फलंदाजीसाठी उतरला तेव्हा चेन्नई सुपर किंग्जने ३.१ षटकांत १ गडी गमावून फक्त १६ धावा केल्या होत्या. त्यामुळे आयुष म्हात्रेने येताच जलद गतीने धावा काढल्या आणि संघाला चांगली सुरुवात करून दिली. आयुष म्हात्रेने पॉवरप्लेमध्ये दोन षटकार लगावले. या हंगामात, चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजाने पॉवर प्लेमध्ये फक्त ३ षटकार मारले. पण आयुष म्हात्रेने त्याच्या पहिल्याच सामन्यात २ षटकार ठोकले.

आयुष म्हात्रे दीपक चहरच्या सातव्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. सीमारेषेजवळ मिचेल सँटनरने एक कमालीचा झेल टिपला. मुंबईच्या बड्या बड्या गोलंदाजांसमोर वादळी खेळी केल्यानंतर आयुष बाद झाला. या खेळीने आयुष म्हात्रेने मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनाही त्याचे कौतुक करण्यास भाग पाडले.

आयुष बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना सूर्यकुमार यादव त्याच्या जवळ आला आणि त्याच्या पाठीवर थाप मारताना दिसला. सूर्यकुमार यादवने आयुष म्हात्रेचं या खेळीसाठी कौतुक करत त्याला प्रोत्साहनही दिलं आणि आयपीएलमध्ये त्याच्या चांगल्या सुरुवातीबद्दल त्याचे अभिनंदनही केले.

आयुष म्हात्रे हा मुंबई क्रिकेट संघाकडून क्रिकेट खेळतो. सूर्यकुमार यादव आणि तो मुंबईकडून एकाच संघातून क्रिकेट खेळतात. सामन्यापूर्वी आयुष म्हात्रे सरावादरम्यानचा सूर्यकुमार यादवचा फोटोही शेअर केला होता.