Suryakumar Yadav Record In IPL 2025: लखनऊ सुपर जायंट्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवची बॅट चांगलीच तळपली. या सामन्यात फलंदाजी करताना त्याने धावांचा पाऊस पाडला. यादरम्यान त्याने असा काही रेकॉर्ड करून दाखवला आहे, जो यापूर्वी कुठल्याही फलंदाजाला जमला नव्हता. त्याने मोठ्या रेकॉर्डमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि सुरेश रैनासारख्या दिग्गज खेळाडूंना मागे सोडलं आहे. काय आहे रेकॉर्ड? जाणून घ्या.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. मुंबईकडून फलंदाजीला येण्यापूर्वी सूर्यकुमार यादवला मोठा रेकॉर्ड करण्यासाठी अवघ्या ३३ धावांची गरज होती. दरम्यान १४ व्या षटकात आवेश खानच्या गोलंदाजीवर शॉर्ट थर्डमॅनला चौकार मारत त्याने आयपीएल स्पर्धेत ४००० धावांचा पल्ला गाठला आहे. यासह त्याने माजी फलंदाज सुरेश रैनाचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. सूर्यकुमार यादव हा आयपीएल स्पर्धेत सर्वांत कमी चेंडूंचा सामना करून सर्वांत जलद ४००० धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड सुरेश रैनाच्या नावावर होता.
आयपीएल स्पर्धेत सर्वांत जलद ४००० धावा करणारे फलंदाज (सर्वांत कमी चेंडूत)
एबी डिव्हिलियर्स -२६५८ चेंडूत
ख्रिस गेल – २६५८ चेंडूत
सूर्यकुमार यादव – २७१४ चेंडूत*
डेव्हिड वॉर्नर – २८०९ चेंडूत
सुरेश रैना – २८८१ चेंडूत
या खेळीसह त्याने दिग्गज फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वांत जलद ४००० धावांचा पल्ला गाठणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. या यादीत ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स सारखे दिग्गज फलंदाज आहेत. या रेकॉर्डसह सूर्यकुमार यादवच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. सूर्यकुमार यादवने आयपीएल स्पर्धेत १५० षटकार पूर्ण केले आहेत. असा रेकॉर्ड करणारा तो १३ वा भारतीय फलंदाज ठरला आहे. या सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वी त्याला केवळ १ षटकार खेचायचा होता. त्याने या डावात फलंदाजी करताना ४ षटकार खेचले आणि हा मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.
मुंबईने उभारला २१५ धावांचा डोंगर
या सामन्यात मुंबईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर आला होता. मुंबईकडून फलंदाजी करताना रायन रिकल्टनने ३२ चेंडूंचा सामना करत ५८ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने २८ चेंडूंचा सामना करत ५४ धावांची खेळी केली. शेवटी नमन धीरने नाबाद २५ धावांची खेळी करत लखनऊ सुपर जायंट् संघासमोर विजयासाठी २१६ धावांचे आव्हान ठेवले.