Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Highlights: सूर्यकुमार यादवच्या वादळी शतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने हैदराबादचा वानखेडेवर दणदणीत पराभव केला. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने ३१ धावांत तीन गडी गमावले. सलग दोन मेडन ओव्हर टाकून हैदराबादने मुंबईला दडपणाखाली आणले होते. पण मग इथून सूर्यकुमार यादव मैदानात आला अन् त्याने एकहाती संघाला विजय मिळवून दिला. पण या खेळीदरम्यान सूर्याला मात्र त्रास होत होता. अर्धशतकापूर्वीच सूर्याला धाव घेताना त्रास होऊ लागला. यानंतरही त्याने हैदराबादच्या गोलंदाजांवर मात करत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले.
सूर्यकुमार यादवने आयपीएलमधील आपले दुसरे शतक ५१ चेंडूत पूर्ण केले. त्याने विजयी षटकारासह संघाला विजयही मिळवून दिला आणि शतक पूर्ण केले. सूर्यकुमार यादवने १०२ धावांच्या खेळीत १२ चौकार आणि ६ षटकार लगावले. या खेळीदरम्यान सूर्यकुमार यादवला धावताना त्रास होत होता. अर्धशतक पूर्ण करण्याआधीच झटपट धावा घेताना सूर्याला त्रास होत होता. यानंतरही त्याने फलंदाजी सुरूच ठेवली. पण त्याला दोन धावा काढणं जमेना. सूर्याने चौथ्या विकेटसाठी तिलक वर्मासोबत १४३ धावांची भागीदारी केली. चौथ्या विकेटसाठी आयपीएलच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च भागीदारी आहे.
सूर्यकुमार यादवला झाली दुखापत?
दुखापतीनंतर ४ महिन्यांच्या ब्रेकनंतर सूर्याने आयपीएलमधून क्रिकेट मैदानावर पुनरागमन केले. सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये सूर्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवले जात होते. पण सूर्या गेल्या दोन सामन्यांपासून क्षेत्ररक्षणही करताना दिसत आहे. टी-२० विश्वचषक समोर असताना सूर्याचे १०० टक्के फिट असणे भारतासाठी अधिक महत्त्वाचे असणार आहे. पण या सामन्यात सूर्याला चालताना त्रास होत होता, पण त्याच्या दुखापतीबद्दलचे अपडेट त्याने सामन्यानंतर दिले.
सामनावीर ठरलेला सूर्यकुमार यादव म्हणाला, “मी खूप दिवसांनी मैदानावर फिल्डिंगसहित संपूर्ण षटके फलंदाजी केली. १४ डिसेंबरनंतर पहिल्यांदाच मी २० षटकांसाठी क्षेत्ररक्षण केले आणि १८ षटके फलंदाजी केली. पण मी आता ठीक आहे. फक्त जरा थकलोय.”
सूर्याने आपले अर्धशतक ३० चेंडूत पूर्ण केले. यानंतर सूर्याने गियर बदलत शानदार फलंदाजी केली आणि त्याने पुढच्या ५० धावा फक्त २१ चेंडूत केल्या आणि मुंबई इंडियन्स चार पराभवांनंतर विजय मिळवून दिला.