Orange Cap Holder Suryakumar Yadav: वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध सामन्यात २८ चेंडूत ५४ धावा काढल्यानंतर ऑरेंज कॅप आता मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवकडे आली आहे. सूर्यकुमारने या खेळीत चार चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी केली. मुंबईची फलंदाजी संपल्यानंतर भारताच्या टी२० कर्णधाराने प्रामाणिकपणे कबूल केले की, हार्दिक पंड्या नाणेफेक हरला आणि मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित करण्यात आले तेव्हा त्याला आनंद झाला होता.
सूर्यकुमार यादवच्या या खेळीमुळे, मुंबई इंडियन्सने निर्धारित वीस षटकांत ७ बाद २१५ धावा केल्या. सलामीवीर रायन रिकेल्टननेही ३२ चेंडूत ५८ धावा केल्या. या डावादरम्यान मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी वानखेडे मैदानावर लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
मुंबईच्या डावानंतर बोलताना सूर्यकुमार म्हाला की, “खरं सांगायचं तर, आम्ही टॉस हरलो तेव्हा मला खूप आनंद झाला. कारण बाहेर खूप, खूप उष्णता आहे आणि मला वाटतं की ते आव्हानात्मक होतं. त्यांनी आम्हाला प्रथम फलंदाजी दिली आणि आम्ही २०० हून अधिका धावा केल्या. मला वाटतं की फलंदाजीच्या दृष्टिकोनातून या धावा खूप चांगल्या आहेत.”
या खेळीदरम्यान, सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये ४००० धावांचा टप्पाही ओलांडला. तो आता ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स नंतर स्पर्धेत सर्वात वेगाने ४००० धावांचा टप्पा गाठणारा तिसरा फलंदाज आहे. तर, वेगाने ४००० धावा करणारा पहिला फलंदाज आहे.
या कामगिरीबद्दल बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, “चांगली कामगिरी करत राहायची आहे. याबाबत मला जास्त काहीही बोलायचे नाही. मी सध्या ते एन्जॉय करत आहे.”
याचबरोबर सूर्यकुमार यादवला असेही वाटते की, वानखेडे मैदानावरील या खेळपट्टीवरील २१५ धावा ही एक उत्कृष्ट धावसंख्या आहे.
हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खास विक्रम
यापूर्वी यंदाच्या आयपीएलच्या ४१ व्या सामन्यात मुंबईने हैदराबादचा ७ विकेट्सने पराभव केला होता. या सामन्यात मुंबईच्या डावात सूर्यकुमार यादवने १९ चेंडूत ४० धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला होता.
या सामन्यात सूर्याने ४० धावांची शानदार खेळी करत खास विक्रम आपल्या नावावर केला होता. आयपीएलच्या इतिहासात सलग ९ डावात २५ हून अधिक धावा करण्याचा पराक्रम करणारा सूर्या आयपीएलच्या इतिहासातील दुसरा फलंदाज ठरला आहे. या हंगामाच्या आयपीएलमध्ये, सूर्याने २९, ४८, २७, ६७, २८, ४०, २६, ६८, ४०* धावा करून इतिहास रचला आहे. सूर्यापूर्वी, ऑरेंज कॅप विजेता रॉबिन उथप्पाने आयपीएल २०१४ मध्ये सलग १० वेळा २५+ धावा केल्या होत्या.