IPL 2025 CSK vs MI Highlights in Marathi: आयपीएल २०२५ च्या सुरूवातीलाच स्पर्धेतील एल क्लासिको सामना मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात चेन्नईने मुंबई इंडियन्सचा पराभव करत विजयासह आपलं खात उघडलं आहे. यासह मुंबई इंडियन्सने आय़पीएलमध्ये सलग १३व्यांदा पहिला सामना गमावला आहे. पहिल्या सामन्यासाठी मुंबई संंघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे होते. या सामन्यानंतर कर्णधार सूर्याने मुंबईने सामना कुठे गमावला याचं उत्तर दिलं आहे.
रचिन रवींद्रच्या ६५ धावा, ऋतुराज गायकवाडचे झटपट अर्धशतक आणि नूर अहमदच्या ४ विकेट्सच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सवर शानदार विजय मिळवला. चेन्नईने आपल्या घरच्या मैदानावर विजयाने मोसमाची सुरुवात केली आहे. शेवटी एमएस धोनीही फलंदाजीला आला पण २ चेंडूत एकही धाव काढू शकला नाही आणि रचिन रवींद्रने षटकार लगावत सामना जिंकला.
चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. परिणामी मुंबई इंडियन्सचे फलंदाज चांगलेच फ्लॉप झाले. मुंबईने २० षटकांत ९ गडी गमावून १५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जने १९.१ षटकात ६ गडी गमावून १५८ धावा केल्या आणि ५ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला.
मुंबई संघाकडून रोहित खाते न उघडताच बाद झाला. तर सूर्यकुमार यादवने २९ धावा व तिलक वर्मानेही ३१ धावा केल्या. शेवटी दीपक चहरने महत्त्वपूर्ण २८ धावा करत संघाला १५५ धावांच्या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. चेन्नईकडून खलील अहमदने ४, नॅथन एलिस, आर अश्विनने १-१ विकेट घेतली आणि नूर अहमदने सर्वाधिक ४ विकेट घेतले.
चेन्नई सुपर किंग्जकडून रचिन रवींद्रने सर्वाधिक ६५ धावा, ऋतुराज गायकवाडने ५३ धावा आणि रवींद्र जडेजाने १७ धावा केल्या. याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही, मात्र तरीही संघाने विजय मिळवला. मुंबईच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि सीएसकेला सहज विजय मिळवू दिला नाही. दीपक चहर आणि विल जॅक्स यांनी १-१ विकेट घेतली आणि विघ्नेश पुथूरने सर्वाधिक ३ विकेट घेतले.
चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध पराभवानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, “अगदी खरंय की आम्ही १५-२० धावांनी मागे होतो, पण सर्व खेळाडूंनी दिलेली झुंज कमालीची होती.” विघ्नेश पुथूरच्या पदार्पणातील कामगिरीबद्दल बोलताना सूर्या म्हणाला, “आश्चर्यकारक, मुंबई इंडियन्स संघ याचसाठी ओळखला जातो, तरुणांना संधी देणे, स्काउट टीम हे १० महिने खेळाडूंच्या शोधात असतात आणि तो याच मेहनतीचं फळ आहे. सामना जर अधिक अटीतटीचा झाला असता तर मी त्याचे एक षटक बाकी ठेवले होते, पण त्याला १८वे षटक देणं ही फार मोठी गोष्ट नव्हती. दव नव्हते पण चिकटपणा होता, दुसऱ्या डावात ऋतुराजने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, या खेळीने सामना आमच्यापासून दूर नेला.”