Who Will Be Mumbai Indians Captain for IPL 2025 MI vs CSK Match: बहुप्रतिक्षित आयपीएलचा १८ वा सीझन येत्या २२ मार्चपासून सुरू होत आहे. याचबरोबर स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच आयपीएलमधील एल क्लासिको सामना म्हणजेच मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. हा दोन्ही संघांचा पहिला सामना असणार आहे. पण मुंबईच्या पहिल्याच सामन्यात संघाचा कर्णधार मैदानाबाहेर असेल. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्त्व कोण करणार हे हार्दिकने सांगितलं आहे.
मुंबई इंडियन्स संघाची स्पर्धेपूर्वीची पत्रकार परिषदे आज म्हणजेच १९ मार्चला झाली. या पत्रकार परिषदेसाठी मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि कोच महेला जयवर्धने उपस्थित होते. यादरम्यान हार्दिकने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच पहिल्या सामन्यात संघाचे नेतृत्त्व कोण करणार हे देखील त्याने सांगितले.
आयपीएल २०२४ मधील अखेरच्या सामन्यातील स्लो ओव्हर रेटमुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हार्दिक आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्यामुळे आता हार्दिकच्या जागी संघाचे नेतृत्त्व कोण करणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या.
रोहित की सूर्या? हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत कोण असणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार?
हार्दिक पंड्याने पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं की, त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्त्व करणार आहे. हार्दि पंड्या या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाला, “सूर्यकुमार यादव भारतीय संघाचेही नेतृत्त्व करतो, त्यामुळे आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे नेतृत्त्व तोच करणार आहे.”
Hardik Pandya on our captain for #CSKvMI:
— Mumbai Indians (@mipaltan) March 19, 2025
"Suryakumar Yadav leads India as well. He will lead Mumbai Indians in the first match of TATA IPL 2025"
मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल 2025 च्या महालिलावापूर्वी संघातील मुख्य खेळाडूंना रिटेन केलं. ज्यामध्ये जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या नावाचा समावेश आहे. या पाचही खेळाडूंनी भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ कर्णधारांचा संघ म्हटलं आहे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे भारतीय संघाचे कर्णधार आहेत. तर हार्दिकने वनडे आणि टी-20 मध्ये संघाचे नेतृत्त्व केले आहे. याशिवाय तिलक वर्माने इमर्जिंग आशिया कप स्पर्धेत भारताचे नेतृत्त्व केले होते.