टीम इंडियाचा माजी स्टार खेळाडू हरभजन सिंग अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतो. हरभजन सिंगने आणखी एक दावा करून क्रिकेट वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. भारताचा प्रतिभावान फलंदाज संजू सॅमसनबद्दल त्याने मोठे वक्तव्य केले आहे. हरभजन सिंगने बीसीसीआयकडे या खेळाडूला भारतीय संघात संधी देण्याबाबत विनंती केली आहे. हा खेळाडू टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करू शकतो, असे त्याने आपले मत मांडले आहे. यासोबतच एमएस धोनीचा उल्लेख करताना त्याने संजूचे कौतुकही केले.
संजू सॅमसनच्या फलंदाजीचे कौतुक करताना हरभजन सिंग म्हणाला, “संजू सॅमसनने कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळली. मला समजत नाही की हा खेळाडू भारतीय संघात का नाही? अनेक युवा खेळाडू संघात येतात, राहतात आणि सामने खेळतात हे आपण पाहतो. संजू सॅमसनकडे असे अप्रतिम कौशल्य आहे. षटकारच चौकार परिस्थिती बघून मारतो,. फिरकी चांगली खेळतो, वेगवान गोलंदाजीही चांगली खेळतो. तरीही त्याचा विचार निवड समिती करत नाही आश्चर्याची गोष्ट आहे.”
संजूने भारताकडून खेळावे – हरभजन सिंग
हरभजन सिंगने आश्वासक खेळाडू संजू सॅमसनबाबत मोठा दावा केला असून तो म्हणाला, “जर तुमचा तुमच्या खेळावर विश्वास असेल तर तुम्ही शेवटपर्यंत खेळ घेऊन जाऊ शकता. धोनी शेवटपर्यंत खेळ घेऊन जायचा. कारण त्याच्या फलंदाजीतील फटक्यांवर त्याला शंका नव्हती. काल रात्री झालेल्या सामन्यात शिमरॉन हेटमायरनेही अशीच कामगिरी करत सामना शेवटपर्यंत नेला. संजूनेही सामना शेवटपर्यंत नेला. त्याच्यात इतकी क्षमता आहे की तो भारतासाठी खेळू शकतो.”
टीम इंडियात अधिक संधी मिळाव्यात – हरभजन सिंग
वास्तविक संजूला अद्याप भारतीय संघात फारशा संधी मिळालेल्या नाहीत. या विषयावर बोलताना हरभजन सिंग म्हणाला, “संजूला टीम इंडियामध्ये अधिक संधी मिळायला हव्यात. सॅमसनबद्दल आपल्याला माहित आहे की तो फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांना योग्य प्रकारे खेळतो. त्याला राष्ट्रीय संघात सतत संधी द्यायला हवी. मी आजपासून नाही तर अनेक वर्षांपासून संजूचा चाहता आहे. कारण तो महान खेळाडू आहे आणि मोठे सामने जिंकवून देण्याची त्याच्यात क्षमता आहे.”
गुजरातविरुद्ध संजूची अफलातून खेळी
काल रात्री झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना गुजरातशी झाला. लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसनने शानदार खेळी केली. त्याने ३२ चेंडूत ६ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ६० धावा केल्या. तो सामना शेवटपर्यंत नेऊ शकला नसला तरी त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे राजस्थानने ५ चेंडू राखून सामना जिंकला. शिमरॉन हेटमायरनेही अप्रतिम खेळी करत सामना शेवटपर्यंत नेला. त्याने २६ चेंडूत ५६ धावांची नाबाद खेळी खेळली.