आयपीएलचा १५ वा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्व संघानी आपली तयारी पूर्ण केली असून सर्वच खेळाडू पूर्ण तागदीनीशी मैदानावर उतरण्यासाठी सज्ज आहेत. दरम्यान, यंदाचा आयपीएल दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे सांगण्यात येत होते. दहशतवाद्यांनी खेळाडू, मैदाने तसेच खेळाडू थांबलेल्या हॉटेल्सची रेकी केल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी याबाबत अधिकचं स्पष्टीकरण दिलंय. आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान मैदान, हॉटेल आणि मार्गावर पुरेसा सुरक्षा बंदोबस्त पुरविण्यात येत असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.
दहशतवाद्यांनी रेकी केल्याची कोणतीही माहिती आलेली नाही
आयपीएल क्रिकेटमध्ये खेळणारे खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत, त्या हॉटेल्स, तसेच मैदाने आणि हॉटेल ते मैदानापर्यंतच्या मार्गाची दहशतवाद्यांनी रेकी केल्याचे म्हटले जात होते. ही बाब सार्वजनिक होताच खेळाडूंच्या सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त केली जात होती. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी दहशतवाद्यांनी रेकी केल्याची माहिती प्राप्त झालेली नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. “आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी मैदानावर तसेच हॉटेल्सवर मुंबई पोलिसांकडून आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात येत आहे. अतिरेक्यांकडून हॉटेल ट्रायडेंट, वानखेडे स्टेडियम, हॉटेल ट्रायडेंट ते वानखेडे स्टेडीयमपर्यंतच्या मार्गाची रेकी झाल्याबाबत सध्या कोणत्याही संस्थेकडून इनपुट किंवा माहिती प्राप्त झालेली नाही,” असे मुंबई पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
तसेच खरदारी म्हणून मुंबई पोलीस खेळाडू तसेच इतर कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा आणि पोलीस बंदोबस्त पुरवला जात आहे, असेदेखील मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.
दहशतवाद्यांनी रेकी केल्याची मिळाली होती माहिती
दरम्यान, दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसने काही दहशतवाद्यांना अटक केलं आहे. या दहशतवाद्यांची चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आल्याचे सांगितले जात होते. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी आयपीएलचे सामने ज्या ठिकाणी खेळवले जाणार आहेत, त्या मैदानांची पाहणी केली होती. तसेच त्यांनी खेळाडू ज्या ठिकाणी थांबलेले आहेत ते हॉटेल्स तसेच हॉटेल आणि मैदानापर्यंत जाण्याच्या मार्गाचीही रेकी केली होती, असे म्हटले जात होते. या चर्चेमुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला होता.