Mohit Sharma’s Reply to Ravi Shastri : अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज मोहित शर्माचा स्वप्नवत प्रवास आयपीएलच्या १७ व्या हंगामात सुरू आहे. गुजरात टायटन्सच्या या वेगवान गोलंदाजाने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर २५ धावांत तीन विकेट घेत ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब पटकावला. डेथ ओव्हर्समध्ये मोहित शर्माच्या वेगवान माऱ्यापुढे सनरायझर्स हैदराबादचा डाव १६२ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने केवळ तीन गडी गमावून लक्ष्य सहज गाठले.
मोहितने शास्त्रींना दिले चोख प्रत्युत्तर –
सामन्यानंतर बक्षीस समारंभात मोहित शर्मा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आला, तेव्हा प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री यांनी मोहित शर्माच्या वयाची खिल्ली उडवली. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजाने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांची मन जिंकली. ३५ वर्षे १९५ दिवसांचा असलेला मोहित शर्मा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार घेण्यासाठी आला, तेव्हा रवी शास्त्रींनी ‘वयानुसार तो चांगली कामगिरी करत आहे’ असे सांगून त्याचे स्वागत केले. यावर मोहित गमतीने म्हणाला, ‘माझं वय वाढतंय याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद सर.’
मोहितने गुजरातच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका –
या सामन्याबद्दल बोलायचे तर, गुजरातने प्रथम मोहित शर्माच्या नेतृत्वाखालील शानदार गोलंदाजी केली. त्यानंतर डेव्हिड मिलरच्या ४४ धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला. मोहित शर्माने डेथ ओव्हर्समध्ये चमकदार कामगिरी केली, तर अफगाणिस्तानचे फिरकी गोलंदाज राशिद खान आणि नूर अहमद यांनी मधल्या षटकांमध्ये धावांवर अंकुश ठेवला. त्यामुळे गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादला ८ बाद १६२ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात गुजरात संघाने १९.१ षटकात २ गडी गमावून १६८ धावा करत सामना जिंकला.
मोहित शर्मा हा धोनीचा शिष्य –
मोहित शर्मा हा महेंद्रसिंग धोनीचा शिष्य मानला जातो. मोहित एकेकाळी चेन्नई सुपर किंग्जचा प्रमुख गोलंदाज होता, जे काम आज दीपक चहर करतोय, ते कधीकाळी मोहित करत असे. आयपीएल २०१४ मध्ये त्याने २३ विकेट घेत पर्पल कॅप जिंकली होती. २०१५ मध्ये महेंद्रसिंग धोनीने त्याला ५० षटकांचा विश्वचषक खेळवला होता. २०१५ पासून भारतासाठी एकही सामना न खेळलेला मोहित २०२२ च्या मोसमात गुजरातचा नेट बॉलर होता, परंतु गेल्या लिलावात प्रशिक्षक आशिष नेहराने त्याच्यावर विश्वास व्यक्त केला होता, ज्यावर तो खरा उतरला आहे.