IPL 2023 Opening Ceremony Updates: ३१ मार्च रोजी आयपीएल २०२३ मधील पहिला सामना चेन्नई आणि गुजरात संघात खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचा भव्य उद्घाटन सोहळा होणार आहे. यामध्ये बॉलिवूड गायक अरिजित सिंग, तमन्ना भाटिया सारखे स्टार्स परफॉर्म करणार आहेत. केवळ जमीनच नाही तर आकाशही उजळून निघेल. फटाक्यांची आतषबाजी तर होईलच, पण सुंदर ड्रोन लाइट शोही आयोजित केला जाईल.
यामध्ये ड्रोनमधून वेगवेगळी छायाचित्रे चमकताना दाखवण्यात येणार आहेत. उद्घाटन समारंभानंतर गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्याने हंगामाची सुरुवात होईल. या सामन्यापूर्वी विद्युत रोषणाई केली जाणार आहे.
आयपीएलचा उद्घाटन सोहळा तब्बल ५ वर्षांनंतर होणार आहे. शेवटच्या वेळी आयपीएलचा उद्घाटन सोहळा २०१८ मध्ये झाला होता, तेव्हापासून दरवर्षी आयपीएल होत असे, पण उद्घाटन सोहळा होऊ शकला नाही. २०१९ मध्ये पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता, त्यामुळे बीसीसीआयने उद्घाटन समारंभ न करण्याचा निर्णय घेतला होता.
आयपीएलच्या उद्घाटन समारंभातील ड्रोन लाइट शोचे दृश्य तुम्ही फोटोमध्ये पाहत आहात, त्याचप्रकारे ड्रोनला जोडलेल्या लाईटसह आकाशात सुंदर सादरीकरण होणार आहे. ज्यामध्ये आयपीएलचा लोगो बनवला जाईल, ट्रॉफी आणि संघाचे लोगो प्रकाशित केले जातील. तमन्ना भाटिया आणि अरिजित सिंग आयपीएलमध्ये परफॉर्म करणार आहेत.
हेही वाचा – IPL 2023: ‘विराटचे आरसीबीसाठी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न सत्यात उतरणार’; ‘या’ माजी खेळाडूने केली भविष्यवाणी
गुजरात विरुद्ध चेन्नई पहिल्या सामन्यात खेळपट्टी कशी असेल?
नरेंद्र मोदी स्टेडियमवर फलंदाजांसाठी मोठे आव्हान असेल. आउटफिल्ड संथ नाही पण लांब सीमारेषेमुळे येथे सिंगल डबलवर जास्त लक्ष केंद्रित करावे लागेल. नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराने येथे प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घ्यावा. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला येथे १८० पर्यंत धावा कराव्या लागतात. कारण १६०-१७० धावांचे लक्ष्य सहज पार केले जाऊ शकते. सुरुवातीला येथे अधिक धावा करण्यावर भर द्यावा लागेल, तर मधल्या फळीत एकेरी दुहेरीवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करेल.