Sanju Samson and Hardik Pandya Viral video: आयपीएल २०२३ मधील २३ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ३ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या मोठ्या सामन्यात गुजरातने २० षटकात १७७ धावा केल्या होत्या, १७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने सुरुवातीलाच ५५ धावांवर ४ विकेट गमावल्या होत्या. या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हार्दिक पांड्या संजू सॅमसनला खुन्नस देत काहीतरी म्हणताना दिसत आहे.
आयपीएलमध्ये रविवारी (१६ एप्रिल) रात्री खेळल्या गेलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात एक मनोरंजक दृश्य पाहायला मिळाले. या सामन्यात जेव्हा कर्णधार संजू सॅमसन राजस्थानसाकडून फलंदाजी करत होता, तेव्हा गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या त्याच्याकडे आला आणि हळू आवाजात काही तरी म्हणून गेला. चांगली गोष्ट म्हणजे या काळात संजूने आपला संयम गमावला नाही आणि तो शांत राहिला.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी गमावून १७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघाने पहिल्या तीन षटकांतच सलामीची जोडी गमावली होती. सुरुवातीच्या १७ चेंडूंवर राजस्थान संघाने केवळ चार धावा करताना दोन विकेट गमावल्या होत्या. येथून राजस्थानचा डाव सांभाळताना संजू सॅमसन संथपणे पुढे सरकू लागला, तेव्हा हार्दिक पांड्याची संतप्त वृत्ती समोर आली.
मोहम्मद शमीच्या षटकात हार्दिक अचानक संजू सॅमसनजवळ आला आणि हळू आवाजात काहीतरी बोलताना दिसला. यानंतर संजू सॅमसनने हार्दिककडे पाहिले आणि मान हलवत पुढे गेला. त्यानंतर ही हार्दिक काही क्षण संजूकडे रागाने बघत राहिला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हार्दिकच्या या वागण्याला क्रिकेट चाहते चुकीचे म्हणत आहेत. त्याचबरोबर चाहते हार्दिक पांड्यावर मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत.
संजू सॅमसन आणि हेटमायर विजयी झाले –
या सामन्यात संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर यांनी राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला. सर्वप्रथम, संजू सॅमसनने बॅक टू बॅक सिक्स मारत राजस्थानची संथ आणि खराब सुरुवात परत ट्रॅकवर आणली आणि नंतर शिमरॉन हेटमायरने राजस्थानला गंतव्यस्थानावर नेले. राजस्थान रॉयल्सने गुजरातसमोर चार चेंडू शिल्लक असताना १७८ धावांचे लक्ष्य गाठले. येथे संजूने ३२ चेंडूत ६०, तर हेटमायरने २६ चेंडूत नाबाद ५६ धावा केल्या. राजस्थानने हा सामना चार चेंडू आणि तीन गडी राखून जिंकला.