Jadeja and Klaassen Argument Video: शुक्रवारी (२१ एप्रिल) रात्री चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या आयपीएल २०२३ मधील २९वा सामना पार पडला. या सामन्यात सीएसकेने एसआरएचचा ७ गडी राखून पराभव केला. दरम्यान या सामन्यात एक मनोरंजक दृश्य पाहायला मिळाले. पहिल्या डावात एसआरएचचा फलंदाज हेनरिक क्लासेन आणि सीएसकेचा फिरकीपटू रवींद्र जडेजा यांच्यात बाचाबाची झाली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जडेजा क्लासेनवर संतापला –

खरं तर, एसआरएचच्या फलंदाजी दरम्यान, रवींद्र जडेजा डावातील १४ वे षटक टाकत होता. त्याच्या पहिल्याच चेंडूवर त्याने मयंक अग्रवालला चकवले होते आणि झेलबाद करणार होता, पण तितक्यात हेनरिक क्लासेन त्याच्यासमोर आला. क्लासमुळे जडेजाला हा झेल पकडता आला नाही. यानंतर जडेजा हेनरिक क्लासेनवर चांगलाच भडकला होता. तो बराच वेळ या प्रोटीज फलंदाजाकडे रागाने पाहत राहिला.

जडेजाने क्लासेनला दिले चोख प्रत्युत्तर –

या घटनेच्या दोन चेंडू नंतरच जडेजा क्लासेनला काहीतरी म्हणाला, ज्याला क्लासेननेही उत्तर दिले. त्यानंतर अंपायरने दोघांमधील हा वाद मिटवला थांबवले. प्रकरण इथेच संपले नाही. या षटकातील पाचव्या चेंडूवर जडेजाने मयंकला पॅव्हेलियनमध्ये पाठवून आपला राग काढला. म्हणजेच क्लासेनची सगळी मेहनत व्यर्थ गेली. मयंक पॅव्हेलियनमध्ये परतत असताना जडेजा पुन्हा एकदा क्लासेनकडे पाहत होता. जडेजा आणि क्लासेन यांच्यातील या सामन्याचा सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनीही खूप आनंद घेतला.

हेही वाचा – Sachin Tendulkar @50: वाढदिवसानिमित्त एका मुलखातीत सचिन तेंडुलकरने वनडे क्रिकेट वाचवण्यासाठी केले सूचक विधान, म्हणाला…

सामन्याबद्दल बोलायचे तर, चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या संघाला २० षटकांत ७ गडी गमावून केवळ १३४ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात चेन्नईने १८.४ षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने ५७ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ७७ धावांची खेळी केली.